पुण्यात विधानसभेला २१ पैकी भाजपला फक्त ९ जागा मिळतील

0
335

पुणे, दि. १९ (पीसीबी) – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांचे सर्व्हे पुढे येत आहेत. दरम्यान, ‘न्यूज एरेना’ या संस्थेने राज्यातील सर्व २८८ विधानसभांचा सर्व्हे केला आहे. यात पुण्यातील २१ जागांपैकी सुमारे नऊ ठिकाणी भाजपला यश मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात भाजपने गमावलेल्या कसबा आणि वडगाव शेरी मतदारसंघाचाही समावेश आहे.

सध्या पुणे शहरासह जिल्ह्यातील कोथरुड, पर्वती, पुणे कॅटोन्मेंट, शिवाजीनगर, खडकवासला, चिंचवड, भोसरी, दौंड हे विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. आता आलेल्या ‘न्यूज एरेना’च्या सर्व्हेनुसार शहरातील कसबापेठ आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपचा विजय होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर सध्या भाजपकडे असलेले शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात भाजपचा पराभव होणार आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा सर्व्हेत केला आहे.

या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील आंबेगाव, खेड आळंदी, बारामती, मावळ, पिंपरी, हडपसर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार आहेत. तर वडगाव शेरी व इंदापूर येथे राष्ट्रावादीचा पराभव होऊन भाजपचा विजय होणार असल्याचे सांगितले आहे. पुरंदर. भोर, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट येथे काँग्रेसचा विजय होणार आहे. दरम्यान, कसबापेठ मतदारससंघात काँग्रेसचा पराभव होऊन भाजपचा विजय होणार असल्याचेही सर्व्हेच्या निकालात सांगतिले आहे. तर दौंड, इंदापूर, चिंचवड, वडगाव शेरी, कोथरुड, खडकवासला, पर्वती आणि कसबापेठ या मतदारसंघात भाजप विजयी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या सर्वेक्षणात महाराष्ट्राबद्दल केलेल्या पाहणीमध्ये भाजपला आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे १२३ ते १२९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ५५, तर काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळणे अपेक्षित आहे. शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. सर्वेक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सर्वाधिक २१ टक्के लोकांनी अशोक चव्हाण यांना पसंती दिली आहे. अजित पवार यांना १४ तर एकनाथ शिंदे यांना १२ टक्के लोकांनी कौल दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर ९ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंत केले आहे.