खळबळजनक…! MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या तरुणीचा संशयस्पद मृत्यू…!

0
438

पुणे,दि.१९(पीसीबी) – राजगड पायथा गुंजवणे येथे राजगड घेरा व गुंजवणे गावाच्या हद्दीवर (सतीचा माळ) येथे एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली. स्थानिक माहितीच्या आधारे तिच्या कुटुंबातील लोकांशी संपर्क करून तिची ओळख पटविण्यात यश मिळवले. दर्शना दत्तू पवार (वय 26, मूळ राहणार सहजानंद नगर ता. कोपरगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. संबंधित तरुणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचीही माहिती मिळत आहे.

मृत तरुणीचे वडील दत्तू दिनकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना ही 9 जून रोजी पुणे येथे वनविभागाचे परीक्षेत (आर, एफ, ओ) विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झालेबद्दल सत्कार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी 10 तारखेपर्यंत 4 वाजेपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होती. मात्र त्यानंतर तिने आमचे फोन उचलले नाही म्हणून मी पुणे येथे चौकशी केली असता ती तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याचे बरोबर सिंहगड व राजगड पाहण्यासाठी गेली असल्याचे कळाले. मात्र ते दोघेही संपर्कात नाहीत व परतही आले नाहित म्हणून मी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे दर्शना हरविल्याची तक्रार देऊन आम्ही सर्वत्र तपास करीत होतो. राजगड पायथा येथे सुद्धा आम्ही तपास केला मात्र काहीही सुगावा लागला नाही म्हणून आम्ही गुंजवणे येथे दर्शनाचा फोटो व आमचे कडील मोबाईल क्रमांक दिला होता. काही माहिती मिळाल्यास कळविण्यात सांगितले होते असे कुटुंबीयांनी सांगितले.

आज (रविवार 18 जून) गावातील काही नागरिक त्या भागाकडे गेले असता त्यांना तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. याची तातडीने माहिती त्या युवकांनी गावातील प्रमुख लोकांना दिली. त्यांनी लागलीच वेल्हे पोलिसांना कळवून घटनास्थळी धाव घेतली, मृत देहाचे वर्णन संबधीत कुटुंबातील लोकांना सांगितले त्या आधारे मृत देहाची ओळख पटविण्यात आली असून मृत्यूचे कारण अध्याप समजले नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितले. पोलीस हवालदार औदुंबर आडवाल, ज्ञानदीप धिवार, अजय शिंदे, गणेश चंदनशिवे, अधिक तपास करीत आहेत यावेळी स्थानिक पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ, राहुल बांदल, बाळासाहेब पवार, राजाराम रसाळ यांनी पोलीस व पीडित कुटुंबाला मोलाचे सहकार्य केले.