उद्घाटनापूर्वीच गुजरातमधील नदीवरचा पूल कोसळला

0
348

गुजरात,दि.१५(पीसीबी) – गुजरातमधीलच तापी येथील व्यारा तालुक्यातील मायापूर आणि देगामा या गावांना जोडणारा मिंधोळा नदीवरील पूल बुधवारी कोसळला. महत्वाचे म्हणजे या पुलाचे अजून उद्घाटनही झाले नव्हते. हा पूल कोसळल्याने जवळपास 15 गावे बाधित झाली आहेत. याआधी 2021 मध्ये साधारण 2 कोटी रुपये खर्चून या पुलाचे बांधकाम सुरु झाले होते. मात्र आता हा पूल कोसळल्याने प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.

या पुलाचे बांधकाम करताना निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा रहिवाशांचा दावा आहे. हा पूल 14 जून रोजी सकाळी कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जाबाबत चिंता निर्माण झाली असून, पूल उभारणीच्या प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहेत. कोसळलेल्या पुलाचा व्हिडिओ स्थानिक टीव्ही चॅनलच्या पत्रकाराने शेअर केला आहे.

वृत्तानुसार, स्थानिकांनी बांधकामाचा दर्जा आणि पुलासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. निकृष्ट साहित्याच्या कथित वापराबाबत रहिवाशांनी ठेकेदारासोबत जोरदार वादावादीदेखील केली. पूल कोसळल्यामुळे बांधकाम प्रक्रियेबद्दल त्यांच्या चिंता आणि शंका वाढल्या आहेत. कोसळण्यापूर्वी या पुलाचे 95% पेक्षा जास्त काम पूर्णत्वास आले होते. मात्र अजून त्याचे उद्घाटन होणे बाकी होते.

परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता नीरव राठोड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पूल कोसळण्याचे कारण शोधण्यासाठी ते सखोल तपास करत आहेत. पूल पडण्यामागची नेमकी कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञांची मते जाणून घेतली जातील. ही घटना गेल्या वर्षी गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पुल दुर्घटनेची आठवण करून देणारी आहे, ज्यात 135 जणांना जीव गमवावा लागला होता.

मोरबी घटनेनंतर, सरकारने पुलाचे बांधकाम आणि देखभाल गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. मात्र तापीमधील हा पूल कोसळल्यामुळे या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये कठोर पर्यवेक्षण आणि जबाबदारीची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.