भोसरीतील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला मुदतवाढ

0
628

पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांचे आवाहन

कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथील कार्यक्रम स्थगित

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) -भोसरी विधानसभा मतदार संघात प्रशासनाच्या वतीने राबवलेल्या ‘‘शासन आपल्या दारी’’ उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अवघ्या १५ दिवसांमध्ये सुमारे ९ हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. ३० ऑगस्टपर्यंत या उपक्रमाला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे दि. १५ जून रोजी नियोजित केलेल्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात येत आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांनी दिली.

राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामाध्यमातून विधानसभा मतदार संघनिहाय दाखले वाटप कार्यक्रम घेण्यात येत आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघात दि. १ जून २०२३ ते दि. १५ जून २०२३ या कालावधीत हा उपक्रम राबवण्याचे नियोजित आहे. नागरिकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या निर्देशानुसार, ‘फर्स्ट इन… फर्स्ट आऊट’ या सूत्रानुसार दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच, सर्व्हर डाउन आणि दाखले वाटप करण्यासाठी प्रणालीत केलेला बदल तसेच, उपक्रमाला मिळालेली मुदतवाढ या अनुशंगाने दि. १५ जून रोजी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे नियोजित दाखले वाटप कार्यक्रम रद्द केला आहे.

तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघात जुलै- २०२३ मध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड संबंधित, श्रावण बाळ योजना तसेच संजय गांधी निराधार योजना याबाबत गावनिहाय कॅम्प लावण्यात येणार आहेत, असेही डॉ. अर्चना निकम यांनी सांगितले.