तामिळनाडूच्या ऊर्जा मंत्र्यांवर ईडीची कारवाई; कारवाई दरम्यान छातीत दुखू लागल्याने…

0
379

तामिळनाडू,दि.१४(पीसीबी) – अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानावर मनी लाँड्रिंग प्रकरणात छापा टाकला. चेन्नईतील सेंथिलच्या घरावर रात्री उशिरा झडती घेतल्यानंतर बुधवारी ईडीने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

ईडीच्या कारवाईदरम्यान सेंथिल यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी चेन्नईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले आहे. येथे ते वेदनेने रडताना दिसले. मंत्री सेंथिल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ते मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांना छाप्याची माहिती मिळाली. ते ताबडतोब टॅक्सी घेऊन आपल्या घरी परतले. छाप्यादरम्यान ईडीच्या अधिका-यांसह सेंट्रल पॅरा मिलिटरी फोर्सचे कर्मचारीही तेथे उपस्थित होते.

तामिळनाडूचे कायदा मंत्री एस रघुपती म्हणाले, सेंथिल बालाजीला टार्गेट करून त्रास देण्यात आला. ईडीने त्यांची २४ तास सतत चौकशी केली. हे पूर्णपणे मानवी हक्कांच्या विरोधात आहे. द्रमुकचे राज्यसभा खासदार एनआर एलांगो म्हणाले की, बालाजींना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 14 जून रोजी पहाटे अडीच वाजेपर्यंत त्यांना त्यांचे मित्र, नातेवाईक आणि वकील यांना भेटू दिले नाही.

कॅश फॉर जॉब्स घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात पोलिस आणि ईडीला त्यांच्याविरुद्ध चौकशी करण्याची परवानगी दिली होती. ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत मंत्र्यांच्या घराची झडती घेण्यात आली. गेल्या महिन्यातच प्राप्तिकर विभागाने (IT) सेंथिलच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले. सेंथिलला ताब्यात घेतल्यानंतर द्रमुक सक्रिय झाला आहे. त्यांची अटक घटनाबाह्य असल्याचे सांगून पक्षाने कायदेशीर लढाई लढण्याचे सांगितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांच्या घरी राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टॅलिन त्यांच्या कायदेशीर टीमसोबत बैठकही घेणार आहेत.