वडगाव रेल्वे स्टेशन परिसरात मृत श्वान, प्लॅटफार्म वरील दुर्गंधीचा प्रवाश्यांना त्रास; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

0
296

वडगाव मावळ,दि.१३(पीसीबी) – मावळ तालुक्यातील वडगाव-मावळ हे तालुक्याचं गाव. पुणे ते लोणावळा या रेल्वे मार्गावर वडगाव येथील रेल्वे स्टेशन वरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. पण गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनच्या पुलाच्या बाजूला अज्ञात व्यक्तींनी मृत श्वान आणून टाकले आहे. या श्वानाची योग्य विल्हेवाट लावली नसल्या करणारे मृत श्वानाचे शरीर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उघड्यावर पडून आहे. यामुळे आता या परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे.

वडगाव रेल्वे स्थानकाच्या मुख्य पुलाजवळच हे मृत श्वान असल्याने पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाश्यांना, तसेच रेल्वेसाठी प्रतीक्षा करणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. स्थानकावर असलेल्या वेटिंग रूम पर्यंत हि दुर्गंधी पसरत आहे. तसेच आता या स्थानकावर अनेक कावळे वास्तव्य करत आहेत. या मृत श्वानाच्या शरीराचे तुकडे हे कावळे संपूर्ण स्टेशन वर पसरवत आहेत.

रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात असून येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच लवकरात लवकर हे मृत श्वान येथून हटवावे व परिसर स्वच्छ करावा अशी मागणी दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.