राष्ट्रवादी तीनदा हारली म्हणून आता मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

0
392

पिंपरी,दि.०९(पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. मावळमध्ये काँग्रेसची ताकद मोठी असून काँग्रेसला मानणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मावळ लोकसभा मतदारसंघात तीन वेळेस अपयश आलेल आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पार्थ पवार यांचा दारून पराभव झाला होता. हे विसरता कामा नये, असे देखील कैलास कदम म्हणाले.

सध्या पुणे जिल्ह्यात लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील विधानसभा, महानगरपालिकेपेक्षा सर्वांचा कल लोकसभेच्या निवडणुकीकडेच असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने मावळच्या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराची जडणघडण काँग्रेसचे स्वर्गीय नेते रामकृष्ण मोरे यांनी केली. शहरात काँग्रेसची पायेमुळे त्यांनीच पसरवली. मूळ मावळ मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी म्हणत मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

यासंबंधी लवकरच पक्षश्रेष्ठींशी बोलणार असल्याचं त्यांनी म्हटले असून, महाविकास आघाडीतील पक्ष आम्हाला सहकार्य करतील, असं त्यांनी म्हटले आहे. परंतु, मावळ लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमका हा मतदारसंघ कोणाला मिळणार, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.