क्लिनिक मध्ये घुसून डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना अटक

0
362

पिंपरी, दि.८ (पीसीबी)- क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारने अटक केली. या आरोपींनी यापूर्वी कासारसाई येथे देखील एका दुचाकीस्वार महिलेला मारहाण करून तिचे दागिने चोरून नेले होते.

बुद्धदेव विष्णू बिश्वास (वय 24, रा. पश्चिम बंगाल), मिंटू मिहीर बिश्वास (वय 26, रा. भोसरी, पुणे. मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबर 2022 रोजी एक महिला दवाखान्यातून उपचार घेऊन दुचाकीवरून घरी जात होती. ती कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्याजवळ आली असता एका व्यक्तीने महिलेला अडवून तिला मारहाण करत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिने चोरून नेले. त्यानंतर 4 फेब्रुवारी 2022 रोजी 26 वर्षीय डॉक्टर तरुणी तिच्या क्लिनिकमध्ये असताना दोघांनी क्लिनीकमध्ये घुसून डॉक्टर तरुणीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटले.

या गंभीर घटनांची दखल घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेने या प्रकरणांचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. आरोपी प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करत असल्याने त्यांना पकडणे पोलिसांना जिकरीचे झाले होते. गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. 7 जून रोजी दोन्ही आरोपी हिंजवडी परिसरात आले असल्याची माहिती पोलीस अंमलदार तुषार शेटे आणि प्रशांत सैद यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार केली. हिंजवडी परिसरात सापळा लाऊन दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींनी कासारसाई आणि हिंजवडी येथील क्लिनिकमधील महिलांना लुटले असल्याची कबुली दिली. दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, शिरगाव, तळेगाव दाभाडे आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक एक गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले. या कारवाईमुळे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहायक फौजदार दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, आदिनाश मिसाळ, पोलीस अंमलदार प्रवीण दळे, रोहिदास आडे, तुषार शेटे, मोहम्मद गौस रफिक नदाफ, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस अंमलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.