ब्रँडेड कंपनीच्या नावाने बनावट कपडे विकणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल

0
365

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – ब्रँडेड कंपनीच्या नावाने बनावट कपडे दुकानात विक्रीसाठी ठेवल्या प्रकरणी पिंपरी मधील एका कपडे विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 3) सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास भीमनगर, पिंपरी येथे करण्यात आली.

दीपक शेरुलाल पागरानी (वय 41, रा. वैभवनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र सोहन सिंग (वय 36, रा. कसबा पेठ, पुणे. मूळ रा. राजस्थान) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या दुकानात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्युमा या कंपनीच्या नावाने बनावट कपडे विक्रीसाठी ठेवले. फिर्यादी हे प्युमा कंपनीसाठी काम करतात. आरोपीने त्याच्या दुकानात ठेवलेल्या बनावट कपड्यांचा प्रकार फिर्यादी यांच्या निदर्शनास आला. त्यानुसार त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. शनिवारी सायंकाळी पावणे पाच वाजता आरोपीच्या दुकानात कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एक लाख सात हजार 300 रुपये किमतीचे तब्बल एक हजार 73 नग बनावट टी शर्ट आढळून आले.

याप्रकरणी दीपक पगरानी याच्या विरोधात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.