पुणे, दि. ३ (पीसीबी) : जिल्हा पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील यांना मोबाईलवर संपर्क करून आपण खासदार अमोल कोल्हे यांचे पी. ए. असल्याची बतावणी करून फसवणुक करणाऱ्याविरूद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुरूवारी (ता. १) पोलीस अधीक्षक पाटील यांना रात्री अकराला भ्रमणध्वनीवर ०९३७३९३९११३ या क्रमांकावरून वरुन हीतरी काम असल्याचा संदेश आला. त्यांनी तत्काळ त्यांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहीते यांना मदत करण्यास सांगीतले.
त्यानुसार मोहिते यांनी तत्काळ नमुद मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता, संबंधीताने आपले नाव प्रबोधचंद्र सावंत असून, खासदार श्री. कोल्हे यांचे पी. ए. असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या मतदार संघातील लोकांच्या एका वाहनाचा शहादा येथे अपघात झाला असून, त्यांना तातडीने मदत करावी, असे सांगत ०९८३४३९५८०९ हा भ्रमणध्वनी क्रमांक दिला.
त्यावर मोहिते यांनी संपर्क केला असता, मोबाईलधारकाने आपले नाव रविकांत मधुकर फसाळे असे कळवून त्यांच्या बोलेरो वाहनाचा शहादा येथे अपघात होवून ०४ लोक ठार व ७ ते ८ जण जखमी झाल्याचे व त्यांच्यावर नंदुरबार येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले.
त्याबाबत नियंत्रण कक्षाकडून तातडीची मदत होण्यासाठी माहिती घेतली असता, असा अपघात झाला नसल्याचे समजले. त्यानंतर ०९८३४३९५८०९ या नंबरवरून पुन्हा मोहिते यांना कॉल करून तत्काळ अंम्बुलन्सद्वारे शिवाजीनगर, पुणे येथे जायचे असल्याचे सांगून वाहनात डिझेलसाठी ७ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर पुन्हा काही वेळाने फसाळे यांनी मोहिते यांना कॉल केला व आपण सकाळपासून काहीही खाल्ले नसल्याने जेवणासाठी २ हजार रूपयांची मदत करावी असे सांगितले. त्यावर मोहिते यांनी सावंत यांना विचारले असता, त्यांनीही याबाबत दुजोरा देत खासदार कोल्हे यांचा निरोप असल्याचे सांगितले. मोहिते यांनी माणूसकीच्या नात्याने फसाळे याच्या फोन पे अकाऊंटवर १ हजार रूपयांची मदत पाठविली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर मोहिते यांनी शुक्रवारी (ता. २) सकाळी नियंत्रण कक्षामार्फत खात्री केली असता, नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत किंवा आसपासच्या जिल्ह्यांतही अशा प्रकारची अपघाताची घटना घडली नसल्याचे समजले. त्यामुळे नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात ४३४/२०२३ भादवी कलम ४२०, १८२ सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.