संगणक हॅक करून अज्ञाताने धमकीचा मेसेज पाठवला. ‘आम्हाला सहकार्य केले नाही तर तुमचा सर्व डाटा तुम्हाला मिळणार नाही’, असे त्या धमकीच्या मेसेज मध्ये म्हटले आहे. हा प्रकार 28 मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वाकड येथील प्रणव इंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कन्स्ट्रक्शन ऑफिस मध्ये घडला.
जितेंद्र दिलीप चौधरी (वय 40, रा. बाणेर) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या ऑफिस मधील संगणक हॅक केला. त्यामध्ये दोन मेल आयडी देऊन जबरदस्तीने संपर्क करण्याबाबत एका फोल्डरमध्ये एक मेसेज सेव केला. ‘जर संपर्क केला नाही तर तुमचा डाटा तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला जर माझ्यावर खात्री नसेल तर एक फाईल आम्ही ओपन करून देऊ. ती आमची गॅरंटी आहे. तुम्ही जर आम्हास सहकार्य नाही केले तर तुमचा सर्व डाटा तुम्हाला मिळणार नाही’, असे त्या फाईल मधील मेसेज मध्ये म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.