नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करून त्यांना पदावरून हटवावे, यासाठी आंदोलन गेल्या महिनाभरापासून राजधानी नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन छेडलं आहे. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी सरकारविरोधात संघर्ष छेडलेला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाची निगरगट्ट शासन नोंद घेत नसल्याने तथा बृजभूषण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने संतापून भारताचे कुस्तीपटू ऑलिम्पिकमधली जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत.
राजधानी नवी दिल्लीत नवीन संसद भवनाचा भव्य उद्घाटन सोहळा सुरू असताना, तिथून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेऊन ताब्यात घेतले. ‘भारतीय कुस्ती महासंघा’चे प्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप या खेळाडूंनी केला असून, सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी ते महिन्याभरापासून ‘जंतर मंतर’वर आंदोलन करीत आहेत. खेळाच्या मैदानावर भारताची शान उंचावलेल्या विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आदींना पोलिसांनी दिलेली वागणूक खेदजनक असल्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण भारतातून उमटल्या. असं असताना कुस्तीगिरांना पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन सुरू करता येणार नाही’, असे दिल्ली पोलिसांनी सोमवारी स्पष्ट केले. या कुस्तीगिरांवर रविवारी करण्यात आलेल्या कठोर कारवाईचेही पोलिसांनी समर्थन केले.
स्वाभिमानाशी तडजोड करुन जगणार नाही, साक्षीचं इमोशनल पत्र…
पोलिसांच्या ताब्यातून सुटलेल्या साक्षी मलिकने ट्विटरवर एक पत्र शेअर केलंय. त्यात ती म्हणते, २८ मे रोजी आमच्यासोबत काय घडलं ते तुम्ही सर्वांनी पाहिलं. दिल्ली पोलीस आमच्याशी कसे वागले, किती निर्दयीपणे आम्हाला अटक करण्यात आली, हे तुम्ही सर्वांनी पाहिलं. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी धुडगूस घालून आमचं आंदोलन उधळून लावलं आणि दुसऱ्याच दिवशी आमच्यावर गंभीर गुन्ह्यांमध्ये एफआयआर दाखल केला. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाचा न्याय मागून काही गुन्हा केला आहे का? पोलिस आणि यंत्रणा आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहेत.
आता असं वाटू लागलंय की आमच्या गळ्यात सजलेल्या या पदकांना काही अर्थ उरला नाही. ते परत करण्याच्या विचारानेच आम्हाला नकोसं झालं. पण स्वाभिमानाशी तडजोड करूनही काय जगायचं..? पण आम्हाला आता या पदकांची गरज नाही कारण ते परिधान करून, ही यंत्रणा केवळ आम्हाला मुखवटा बनवून स्वतःचा प्रतार करते आणि नंतर नेहमीच शोषण करते. त्या शोषणाविरुद्ध बोललो तर ही यंत्रणा तुरुंगात टाकण्याची तयारी करते. पदक हे आमचं जीवन, आमचा आत्मा आहे. ते गंगेत वाहून गेल्यावर आमल्या जीवनालाही अर्थ उरणार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार आहोत. आज संध्याकाळी ६ वाजता हरिद्वार येथे आमची पदके गंगेत अर्पण करणार आहोत.