भगवद्गीतेत सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतात!”

0
290

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) “भगवद्गीतेत सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतात!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय अत्रे यांनी खानदेश मराठा मंडळ सभागृह, पेठ क्रमांक २४, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक २७ मे २०२३ रोजी व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव लिखित आणि संवेदना प्रकाशन निर्मित ‘भगवद्गीता अनुभवताना…’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दत्तात्रय अत्रे बोलत होते. श्रीनृसिंह सरस्वती देवस्थान – लाडकांरजाचे शरद पवार, जलसंपदा विभाग स्थापत्य अभियंता रमेश मगर, गांधीबाग सहकारी बँक – नागपूरचे व्यवस्थापक प्रशांत फुके, न्यू इंडिया इन्शुरन्स – पुणेचे वरिष्ठ व्यवस्थापक अनिल शिंदे, डॉ. प्रवीण गांजरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, रजनी अहेरराव, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच माजी‌ उपमहापौर शैलजा मोरे यांच्यासह शहरातील सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

दत्तात्रय अत्रे पुढे म्हणाले की, “बी पेरताना जमिनीच्या ओली अन् खोलीचा अंदाज घेतला जातो. अध्यात्मातील वाटचाल हीसुद्धा अशीच असते. सतारीची छेडलेली तार जशी उत्कट आनंदाची अनुभूती देते; तशीच अनुभूती अध्यात्मातून मिळते. ‘भगवद्गीता अनुभवताना…’ या पुस्तकातून सांख्य, भक्ती, ध्यान, राज अशा विविध योगांचा परिचय होतो. त्यामुळे अंत:करणामध्ये प्रार्थना ध्वनित होते!” शरद पवार यांनी, “राज अहेरराव यांनी केलेले लेखन भगवद्गीता समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल!” असा विश्वास व्यक्त केला. डॉ. प्रवीण गांजरे यांनी, “साहित्यिकांची कल्पनाशक्ती अफाट असते!” असे मत मांडले. लेखक राज अहेरराव यांनी आपल्या मनोगतातून, “भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून मानवी जीवनाला कलाटणी देणारा अद्भुत ग्रंथ आहे म्हणून त्यावर लेखन करावेसे वाटले!” अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी अनिता शिंदे यांनी कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला.

मंगेश पोहणेकर, अजय हेडावू, नंदकुमार मुरडे, पी. बी. शिंदे, संपत शिंदे, अश्विनी कुलकर्णी, अनिकेत गुहे, राजेंद्र घावटे, माधुरी ओक आणि नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. तुकाराम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्निल अहेरराव यांनी आभार मानले.