अनोळखी लिंकवरील एक क्लिक पडला महागात; पावणे पाच लाखांची झाली फसवणूक

0
207

बावधन, दि. २८ (पीसीबी) – बँकेचा प्रतिनिधी बोलत असल्याचे भासवून मेसेज करणाऱ्या व्यक्तीने एका दाम्पत्याला मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले. कोणतीही खातरजमा न करता क्लिक करणे त्या दाम्पत्यास चांगलेच महागात पडले. दाम्पत्याच्या बँक खात्यातून तब्बल चार लाख 78 हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार एक मार्च रोजी बावधन येथे घडला.

याप्रकरणी 52 वर्षीय महिलेने सुमारे तीन महिन्यानंतर शनिवारी (दि. 27) हिंजवडी पोलीस ह्ताण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8987904192 या मोबाईल फोन क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पतीच्या मोबाईल फोनवर आरोपीने टेक्स्ट मेसेजद्वारे एक लिंक पाठवली. आरोपीने तो बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून लवकरात लवकर पॅनकार्ड अपडेट करा नाहीतर बँक खाते बंद होईल, अशी भीती घालणारे मेसेज वारंवार केले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पतीला मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले. दोघांनी मेसेज मधील लिंकवर क्लिक केले असता फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 88 हजार आणि त्यांच्या पतीच्या बँक खात्यातून तीन लाख 90 हजार 300 रुपये असे एकूण चार लाख 78 हजार 300 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.