वर्षभर कुणी महामंडळ, मंत्रिपद मागायचा नाही…

0
193

पुणे, दि. १८ (पीसीबी) : “आपण एक-एक स्वप्न पार पाडतोय. अशा परिस्थितीत हे एक वर्ष आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एका वर्षात जे आपलं समर्पण असेल ते भारतीय जनता पक्षाकरता नाही, ते या देशाकरता असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याकरता असेल, ते खऱ्या अर्थाने भारताला पुन्हा एकदा परम वैभवपण देण्याकरता हे समर्पण देण्याची आपली तयारी आहे का? हा माझा सवाल आहे. सांगा मला, आपली तयारी आहे का?”, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना विचारला.

भाजपची राज्य कार्यकारिणी नुकतीच बैठक पार पडली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक पार पडली. या बैठकीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडे त्याग मागितला.

“मी विचारलं म्हणून सांगू नका, मनापासून तयारी आहे का? मग मी आज सांगतो, पुढच्या एक वर्षात कुणालाही काही मिळणार नाही. कुणी समिती मागायची नाही, कुणी पद मागायचं नाही. कुणी मंत्रिपद मागायचं नाही. मंत्रिपद मागायचं नाही म्हटल्यावर सगळ्यांनी हो म्हटलं. पण एकही आमदार हो म्हणायला तयार नाही. आपण विस्तार करु, काळजी करु नका”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

‘तो भाजपचा खरा कार्यकर्ता होऊ शकत नाही’
“अतिशय गंभीरपणे मी म्हणू इच्छितो, आता ही वेळ आहे, पक्षाने मला काय दिलं? हे न विचारता मी पक्षाला काय देणार? हे सांगण्याची वेळ आहे. ज्याच्यामध्ये ही हिंमत आहे की, मी मागणार नाही देणार, ज्याच्यामध्ये ही दानत आहे की, मी मागणार नाही तर देणार, तोच खरा भाजपचा कार्यकर्ता. जो केवळ घेण्याकरता या ठिकाणी आहे तो भाजपचा खरा कार्यकर्ता होऊ शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.‘तेव्हा वाटतं आपण कशाकरता या राजकारणात आहोत?’

“अनेक हौशे-नौशे-गौशे असतात, सगळेच आपल्याला लागतात. पण समर्पण आपल्याला लागतं. मला आज खरोखर आनंद आहे, आपल्याकडे जुने-नवे कार्यकर्ते आहेत. अनेक नवे कार्यकर्ते जेव्हा समर्पणाने काम करताना दिसतात, ज्यांचा कदाचित पक्षाशी फार संबंध आला नसेल, तरी मला मनापासून आनंद होतो. पण कधीकधी एखादा जुना कार्यकर्ता पद मिळालं नाही, मनासारखी गोष्ट झाली नाही म्हणून आक्रोश करताना दिसतो त्यावेळेस वाटतं की, आपण कशाकरता या राजकारणात आहोत ? आपलं राजकारणाचं ध्येय काय आहे ? हा प्रश्न माझ्यासमोरही तयार होतो”, असं फडणवीस म्हणाले.

‘…तर मी एक वर्ष घर सोडायला तयार’
“मी आज तुमच्याकडून त्याग मागतोय. मी तुम्हाला ऑफर देतो, तुम्ही मला सांगात तो त्याग करायला मी तयार आहे. तुम्ही मला पद सोडायला सांगितलं तर पद सोडायला तयार आहे. तुम्ही मला सांगाल घर सोड, तर मी एक वर्ष घर सोडायला तयार आहे. मी त्याग करायला तयार आहे, तुमची त्याग करायची तयारी आहे का? ते मला सांगा”, असं फडणवीस म्हणाले.

“तुमची त्याग करायची तयारी असेल तर नुसतं हात वर करुन चालणार नाही. येत्या काळात तुमच्या कामाचं मुल्यमापन होईल. वर्षभरानंतर खऱ्या अर्थाने ज्यांनी त्याग केला आहे, त्यांचंच मुल्यमापन केलं जाईल. ज्यांनी त्याग केला नाही त्यांचा उपयोग राहणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले