सत्तासंघर्षाचा निवाडा आता सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तूर्तास जीवदान

0
332

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निवाडा आता सात न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला तूर्तास जीवदान मिळाले असून १६ आमदारांच्या अपात्रतेवर आता सात न्यायमूर्तींचे घटनापीठ ठरविणार आहे. भाजप आणि शिंदें यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल दिलासादायक असून पुढचे काही महिने शिंदे हेच मुख्यमंत्री राहू शकतात.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी झाली. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्याही वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी सुनावणी मार्च महिन्यात पूर्ण झाली होती. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाबाबत गेल्या दोन दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी हा निकाल आज जाहीर केला.