तळवडे स्पाईन रोडच्य बाधितांचे उपोषण 27 व्या दिवशीही सुरूच

0
204

पिंपरी, दि. १० (पीसीबी) :- तळवडेतील स्पाईन रोडच्या बांधकामामुळे बाधित झालेल्या रहिवाशांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे आपल्या प्रलंबीत मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. हे बाधित रहिवाशी १३ एप्रिल २०२३ पासून स्पाईन रोड येथील राम मंदिराच्या जवळ उपोषणास बसले आहेत. स्पाईन रोडच्या रुंदीकरणात १३२ रहिवाश्यांची घरे बाधित झाली आहेत. या बाधित कुटूंबांना महापालिका प्रशासनाकडून मोशी येथील प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक ११ येथे भूखंड मंजूर करण्यात आलेले आहेत.

बाधित कुटुंबे ही मध्यमवर्गीय असल्यामुळे त्यांना नवीन बांधकामाचा खर्च हा परवडण्याजोगा नाही. यासाठी महापालिकेने बाधितांच्या नवीन बांधकामाची किंमत ठरवून ती रक्कम बाधितांना द्यावी. तसेच नवीन पाणी व वीज जोडणी शुल्क ही माफ करावे. जोडीला बांधकाम करताना प्लॅन पासचा खर्च ही माफ करावा अशी मागणी उपोषणकर्ते करत आहेत.

शिवाय ज्या बाधितांचे जास्त भुखंड व जास्त बांधकाम असेल त्यांना अतिरिक्त योग्य मोबदला मिळावा व बांधकामाचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत प्रचलित पध्दतीने भाडे हे बाधित रहिवाश्यांना मिळावे. तसेच मोकळ्या भुखंड असणाऱ्या बाधित भुखंड धारकांना २०१३ च्या जीआर नुसार योग्य मोबदला मिळावा. अश्या ही काही मागण्या उपोषणकर्ते महापालिका प्रशासनाकडे करत आहेत.

या उपोषणात सहभागी असणारे सामाजिक कार्यकर्ते निलेश चौरे म्हणाले की,आम्ही आमच्या प्रलंबीत मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. पण महापालिका प्रशासनाकडून आम्हाला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळेच आम्ही बेमुदत साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. जर आमच्या मागण्यांना प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. तर आम्ही आमचे आंदोलन आणखी तीव्र करू.

आतिश जाधव, रामदास निर्वाण, विवेक वाघधरे, अशोक जाधव, राजेंद्र अग्रवाल, विजय चिंचोलकर, उमेश गवळी, हे बाधित रहिवाशी या उपोषणात अग्रक्रमाने सहभागी झालेले आहेत.