पुणे, दि. ९ : पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मानली जात आहे. नोटांनी भरलेल्या कोट्यवधींच्या बॅगा पकडण्यात आल्या. पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्रजवळ पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी नोटा मोजण्याच्या मशिन्स देखील जप्त केल्या आहेत. ४७ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे पोलिसांकडून रात्रीच्या वेळी वाहनांची नाकाबंदी करून तपासणी करण्यात येत आहे. त्यात सोमवारी रात्री साधारण साडेअकरा वाजताच्या सुमारास हडपसर परिसरातील शेवाळेवाडी परिसरात असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्राजवळ पोलिसांकडून संशयित वाहनाची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी पोलिसांना ब्रिझा गाडीत एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या.
पोलिसांनी त्याला गाडी साईडला घ्यायला लावून त्याच्या गाडीच्या डिकीची तपासणी केली. त्यावेळी त्या डिकीत काही बॅगा संशयास्पदरित्या आढळून आल्या. बॅग उघडून पाहिले असता त्यात नोटांचे बंडल यावेळी दिसून आले. त्यानंतर गाडीसह चालकाला पोलिस स्टेशनला आणण्यात आले.
वाहतूक शाखा, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा युनिट 5 यांनी संशयित ब्रिजा कार MH 13 CK 2111 ही ताब्यात घेऊन संशयित इसमाला हडपसर पोलीस स्टेशनला आणले. त्यानंतर दोन पंचांसमक्ष पंचनामा करून वाहनात मिळून आलेल्या बॅगा तपासल्या. त्यामध्ये एकूण 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये मिळून आले.
ही रोख रक्कम मोजून दोन पंचांसमक्ष जप्त करून सीलबंद करण्यात आली आहे. प्रशांत धनपाल गांधी (वय 47 वर्षे, खत व्यवसाय, दूध व्यवसाय, किराणा दुकान व शेती व्यवसाय, रा. लासूरणे ता. इंदापूर जि. पुणे) यांच्यासह ताब्यातील वाहन जप्त करण्यात आले आहे.
कलम 41(ड) अन्वये हडपसर पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली असून आयकर विभाग, पुणे यांना पुढील कारवाईबाबत कळविण्यात आले आहे. ही रक्कम त्याच्या राहत्या घरातून पुणे येथील महाराष्ट्र बँक मुख्य शाखा, लक्ष्मीरोड येथे कर्जापोटी भरायची होती असे त्याने सांगितले.
पोलिसांनी जप्त केलेल्या नोटा या नेमक्या कुठल्या कारणासाठी आणण्यात आल्या होत्या. त्याचा कर्नाटक निवडणुकीशी काही संबंध आहे का? या नोटा कुणी पाठवल्या होत्या याचा कसून तपास पोलिसांकडून केला जात आहे. नोटासोबत त्या मोजण्याचे मशिन्स देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. हडपसर पोलिसाकडून याचा तपास केला जात आहे.