धक्कादायक! एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये पाच वर्षांत ४० हजारांहून अधिक महिला बेपत्ता

0
286

अहमदाबाद, दि. ९ (पीसीबी)- गुजरातमध्ये पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल ४०,००० हून अधिक महिला बेपत्ता झाल्या, अशी अधिकृत आकडेवारी आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये ७१०५, २०१७ मध्ये ७७१२, २०१८ मध्ये ९२४६ आणि २०१९ मध्ये ९२६८ महिला बेपत्ता झाल्या. २०२० मध्ये ८२९० महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. ही एकूण संख्या ४१,६२१ पर्यंत पोहचत आहे. २०२१मध्ये विधानसभेत राज्य सरकारने केलेल्या निवेदनानुसार, अहमदाबाद आणि वडोदरा येथे अवघ्या एका वर्षात (२०१९-२०) ४’७२२ महिला बेपत्ता झाल्या.

माजी आयपीएस अधिकारी आणि गुजरात राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य सुधीर सिन्हा म्हणाले, “काही बेपत्ता महिलांच्या प्रकरणांमध्ये, मी पाहिलं आहे की मुली आणि महिलांना गुजरात सोडून इतर राज्यात पाठवले जाते आणि त्यांना वेश्याव्यवसायात जाण्यासाठी भाग पाडले जाते.” “पोलिस यंत्रणेची समस्या अशी आहे की’ ती हरवलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांना गांभीर्याने पाहत नाही. अशी प्रकरणे खुनापेक्षाही गंभीर असतात. कारण जेव्हा एखादे मूल हरवते तेव्हा पालक आपल्या मुलाची वर्षानुवर्षे वाट पाहत असतात आणि हरवलेल्या प्रकरणाची चौकशी खुनाच्या प्रकरणाप्रमाणेच कठोरपणे व्हायला हवी,” ते पुढे म्हणाले.

माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. राजन प्रियदर्शी म्हणाले की, “मुली बेपत्ता होण्यासाठी मानवी तस्करी जबाबदार आहे. माझ्या कार्यकाळात, मी निरीक्षण केले आहे की, बेपत्ता झालेल्या बहुसंख्य महिलांना अवैध मानवी तस्करी गट उचलतात, जे त्यांना दुसऱ्या राज्यात नेऊन त्यांची विक्री करतात. जेव्हा मी खेडा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक (एसपी) होतो, तेव्हा उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने जिल्ह्य़ात मजूर म्हणून काम करत असलेल्या एका गरीब मुलीला उचलून तिच्या दुसऱ्या राज्यात विकले, जिथे तिला कामावर ठेवले होते. आम्ही तिची सुटका करण्यात यशस्वी झालो, परंतु बऱ्याच बाबतीत असे घडत नाही.”

गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते हिरेन बनकर म्हणाले, “भाजप नेते केरळमधील महिलांबद्दल बोलतात पण देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये 40,000 हून अधिक महिला बेपत्ता आहेत.”