झटपट पैशांचा हव्यासाने झाली 36 लाखांची फसवणूक

0
269

वाकड, दि. ७ (पीसीबी) -झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासाने एका व्यक्तीने अनोळखी व्यक्तींना पैसे दिले. पैशांची गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत जास्त पैसे मिळतील, असे आमिष व्यक्तीला दाखवण्यात आले होते. त्यातून त्या व्यक्तीची तब्बल 36 लाख दोन हजार 500 रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार 14 एप्रिल रोजी दुपारी पिंपरी येथे घडला.

चिन्मय राजन पंडित (वय 39, रा. वाकड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 856209767110 या क्रमांकाचा मोबाईल धारक तेज बाबू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका कंपनीत काम करतात. ते 14 एप्रिल रोजी कामावर असताना त्यांना अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यामध्ये एक लिंक देण्यात आली होती. लिंकवर फिर्यादींनी क्लिक केले असता त्यांना गुंतवणुकीची एक ऑफर आढळली. कमी कालावधीत जास्त पैसे मिळतील, अशा प्रकारचा सर्व प्रकार होता. त्यातून फिर्यादींनी 36 लाख दोन हजार 500 रुपये अनोळखी व्यक्तीला ऑनलाईन माध्यमातून पाठवले. मात्र अशी कोणतीही योजना नसून हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.