…म्हणून अजितदादा `त्या` पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते

0
265

बारामती, दि. ७ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं होतं. पत्रकार परिषदेत उपस्थित न राहता अजित पवार दिल्लीला गेल्याचं सांगितलं जात होतं ,त्यावर आज बारामतीत अजित पवारांनी पत्रकार परिषदेत गैरहजर असण्याचं कारण सांगितलं आहे. माध्यमांनी अफवा पसरवू नये, म्हणून अजितदादांनी चक्क त्यांच्या आठवड्याभराचा नियोजित कार्यक्रमच पत्रकारांना सांगितला.

“मी पत्रकार परिषदेत नव्हतो तर काहींनी सांगितलं की, मी दिल्लीला गेलो. पण मी पुण्यात होतो, त्यानंतर पुण्यातून मी पहाटे उठून दौंडला गेलो, तिथे माझा कार्यक्रम होता. त्यानंतर मी कर्जतला गेलो, तिकडची काम आटोपून मी आज, रविवारी बारामतीला आलो . बारामतीला आज माझा मुक्काम आहे. त्यानंतर उद्या, 8 मे ला गोरेगावला जाणार, तिकडे माझे काही कार्यक्रम, मेळावे आहेत. ते सगळं करुन दुपारी साताऱ्याला जाणार, तिकडे दुपारी, संध्याकाळी आमचे कार्यक्रम आहेत. त्यानंतर 9 मेला फलटणला माझा रामराजे निंबाळकर यांच्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम आहे. 10 मेला मी उस्मानाबाद, लातूरमध्ये आहे आणि 11 मेला मी नाशिकमध्ये आहे. तसंच, 12 ला मी पुणे दौऱ्यावर आहे, असं अजित पवार म्हणाले. आठवड्याभराचा कार्यक्रम सांगत अजित पवारांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

“पवार साहेबांनी जो आदेश दिला होता त्या नुसारच ठराविक लोक पत्रकार परिषदेला हजर राहिले, बाकीचे हजर राहिले नाहीत.मी हजर नव्हतो कारण पवार साहेबांनीच प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील व इतर काही मान्यवरांना पत्रकार परिषदेला यावे असे सांगितले होते, पत्रकार परिषदेत खुर्च्याही मर्यादीत असतात, त्या मुळे साहेबांच्या सूचनेनुसारच आम्ही आमच्या कामाला गेलेलो होतो, त्या बाबतही विनाकारण बातम्या चालविल्या गेल्या,” असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, “ज्यांना माझे काम बघवत नाही, मी जे करतो त्या बद्दल ज्यांच्या मनामध्ये चुकीच काहीतरी असत, आमच्यावर अतिशय प्रेम करणारी जी लोक आहेत, तेच माझ्याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार करतात. शरद पवार यांच्या राजीनाम्याचा विषय संपला आहे. आता आम्ही आमच्या कामाला लागलो आहोत. शरद पवार यांनी जी भूमिका मांडली तीच पक्षाची अंतिम भूमिका आहे, पवारसाहेबांच्या भूमिकेवर मी काहीही मत व्यक्त करणार नाही,”

अजित पवारांच्या भूमिकेच्या प्रश्नावर काल (शनिवारी) शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे जमिनीवर काम करणारे नेते आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये काय चालले आहे याची त्यांना फारशी चिंता नसते. ते ठिकठिकाणी जातात आणि आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यस्त राहतात. मात्र माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. त्याच्याबद्दल बोलल्या जात असलेल्या सर्व गोष्टी निराधार आहेत,”