दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्याकांडाचा तपास न्यायासाठी नव्हे तर राजकारणासाठी

0
253

पुणे, दि. ६ (पीसीबी) : पूर्वग्रहानुसार आधीच निश्चित केलेले खुनी, त्या दृष्टीने जुळवलेले पुरावे, आधीच बेपत्ता असलेले संशयित आणि प्रत्येक आरोपपत्रात नवे आरोपी! यामुळे दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्याकांडाचा तपास न्यायासाठी नव्हे तर राजकारणासाठी चालला आहे, असे स्पष्ट मत द रॅशनॅलिस्ट मर्डर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी यांनी व्यक्त केले.

पुरोगामी विचारवंत, लेखक आणि कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या तपासातील कच्चे दुवे आणि चुकीच्या तपास पद्धतीवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे लेखन डॉ. थडाने यांनी केले आहे. त्याचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका शेफाली वैद्य आणि विद्याधर नागोर यांच्या हस्ते पार पडले. डॉ.थडाने म्हणाले,”अनेक वर्षानंतरही पोलिसांना आरोपी निश्चित करता आले नाही.

प्रत्येक आरोप पत्रातील आरोपी बदलत असून, त्यांचे रेखाटनही संशयास्पद आहे. अनेकांना मारून मुटकून जबाब नोंदवल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले आहे. प्रत्येकवेळी कथानकही बदलत असून, पोलिसांनी स्वतःचे कथानक सिद्ध करण्याऐवजी तथ्यांच्या आधारे तपास करणे गरजेचे आहे.” गौरी लंकेश यांच्या प्रकरणात तर प्रत्यक्षदर्शींचे आरोपींचे केलेले रेखाटनही जुळत नसून, प्रत्येक आरोप पत्रावेळी नवे आरोपी दाखवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

चारही विचारवंतांच्या हत्येतील युक्तिवाद आणि सरकारी कागदपत्रे वाचले, तर संपूर्ण तपास प्रक्रियेतच गोंधळ असल्याचे मत वैद्य यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,”पोलिसांनी आधीच दोषींना निश्चित करून माध्यम ट्रायल घेतली आहे. याच कालखंडात झालेल्या इतर विचारवंतांच्या तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले.”

डॉ.थडाने म्हणाले…

– पोलीस प्रत्येक वेळी नवे आरोपी उभे करतात

– नव्या आरोप पत्रात आरोपींचे रेखाटनही बदलते

– रात्रीच्या अंधारात हेल्मेट घालणाऱ्या संशयिताचे रेखाटन तयार करणे अजब गोष्ट

– संपूर्ण तपासा आधीच आरोपपत्र दाखल कसे होते