शरद पवारांनी मागे घेतला राजीनामा; कोअर कमिटीच्या प्रस्तावानंतर बदलला निर्णय

0
242

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. मी माझा निर्णय मागे घेत आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर, मुंबईत पक्षाच्या कमिटीची बैठक झाली. त्यात सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते. यादरम्यान शरद पवार यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने शरद पवार यांना पक्षाचे नेतृत्व सुरू ठेवण्याची विनंती करणारा ठराव मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हा ठराव मांडला. यानंतर समितीच्या सदस्यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.

बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शरद पवार यांनी 2 मे रोजी अचानक राजीनामा जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. पुढील कामकाज आणि नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांची समिती नेमली. आज आमची समितीची बैठक झाली. त्यात आम्ही पवार साहेबांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली आहे. आम्ही त्यांना सतत त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली, कारण यावेळी देशाला आणि पक्षाला त्यांची गरज आहे. केवळ राष्ट्रवादीचे नेतेच नाही तर पक्षाच्या इतर नेत्यांनी आणि मान्यवरांनीही त्यांना पक्षप्रमुखपदी कायम राहण्याची विनंती केली.