“स्वतः श्रीकृष्ण होऊन मनातील अर्जुनाचा संभ्रम दूर करा!” छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला – पुष्प तिसरे

0
347

पिंपरी,दि. ४ (पीसीबी) – “स्वतः श्रीकृष्ण होऊन मनातील अर्जुनाचा संभ्रम दूर करा म्हणजे भारताच्या विश्वगुरू होण्याच्या वाटचालीत सहयोगी होता येईल!” असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र तथा राजाभाऊ मुळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ प्रांगण, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे बुधवार, दिनांक ०३ मे २०२३ रोजी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित पाच दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत ‘भारतीय मानस : संभ्रमातून सत्याकडे’ या विषयावरील तृतीय पुष्प गुंफताना रवींद्र मुळे बोलत होते. इंद्रायणी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष महेश चांडक, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

रवींद्र मुळे पुढे म्हणाले की, “जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येणारी संभ्रमावस्था ही एक मानसिक स्थिती असून ती समाजाला आत्मनाशाकडे नेते. प्राचीन काळापासून ऋषी – मुनी, संत – महंत, साहित्यिक – कलावंत यांनी समाजाला संभ्रमावस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा विदुर यांनी संभ्रमाला ‘मंत्रविप्लव’ असे नाव दिले होते.

आपल्या देशात ब्रिटिशांनी कुटिल नीतितून वेगवेगळे संभ्रम निर्माण केले. सन १९४७ पासून भारत हे एक राष्ट्र म्हणून उदयास आले. त्यापूर्वी भारत हा एकसंध देश किंवा राष्ट्र नव्हते, हा संभ्रम पाश्चात्त्य देशांच्या ‘नेशन’ या संकल्पनेच्या आधारे प्रसारित करण्यात आला.‌ वास्तविक रामायण, महाभारत काळापासून अन् सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी भारत हे राष्ट्र म्हणून अस्तित्वात असल्याचे असंख्य उल्लेख भारतीय संस्कृतीत आढळून येतात. आमच्या ‘मंत्रपुष्पांजली’मध्ये राष्ट्रांचे विविध प्रकार वर्णन केले आहेत. वायू, विष्णू, मार्कंडेय आणि ब्रह्मवैवर्त या पुराणांमध्ये तसेच नाटककार कालिदास, भास यांच्या साहित्यकृतींमध्ये अखंड भारताच्या भौगोलिक सीमा, संस्कृतीवैविध्य आणि ‘भारत’ या नावाच्या व्युत्पत्तीचा ऊहापोह केला आहे.

ज्यांनी आमच्यावर दीडशे वर्षे राज्य केले, त्याच ब्रिटिशांनी आमचा इतिहास लिहिला. हिंदू, मुस्लीम आणि ब्रिटिश असे तीन कालखंड त्यांनी नमूद केले. वास्तविक हजारो वर्षांपासून अनेक आक्रमणे होऊनही भारत देश हे एक हिंदू राष्ट्र आहे. मात्र, हिंदू हे बाहेरून आलेले असून मूलनिवासी हे इथले नागरिक आहेत, असाही संभ्रम निर्माण केला गेला आहे. हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराज यांचा इतिहासदेखील विकृतपणे मांडण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे. हिंदू धर्म ही एक धारण करण्याची वृत्ती आहे किंबहुना जीवन जगण्याची पद्धत आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशी भारतीय संस्कृती असूनही या संस्कृतीला बदनाम करण्याचे षडयंत्र अनेकदा रचले गेले आहे. या देशात शिक्षण व्यवस्था नव्हती; तर इंग्रजांमुळे शिक्षण आणि शासन व्यवस्था निर्माण झाली, असाही संभ्रम निर्माण केला गेला आहे. वास्तविक ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी’ ही भारतीय मानसिकता लॉर्ड मेकॉले प्रणीत शिक्षणपद्धतीने बदलून टाकली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात काळे इंग्रज निर्माण होऊ लागले आहेत. भारतीय संस्कृतीत स्त्रीला सन्मानाचे स्थान नाही, असाही अपप्रचार केला जातो; परंतु सरस्वती ज्ञानाची, लक्ष्मी धनाची आणि दुर्गा शौर्याची देवता आहे; तर मैत्रेयी, गार्गी, भारतीदेवी या विदुषी प्राचीन काळापासून ज्ञात आहेत. एवढेच नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य हे अहिंसेमुळे प्राप्त झाले, असा धादांत खोटा प्रचार करून असंख्य क्रांतिकारकांचे बलिदान फोल ठरवले जाते.

साहित्य, कला, संस्कृती यांच्यावर नियंत्रण मिळवून वैचारिक दहशतवाद निर्माण केला गेला आहे. हिंदूंच्या मंदिरव्यवस्थेची टिंगलटवाळी केली जाते. विकृतीचे उदात्तीकरण करणारे विजय तेंडुलकर साहित्यिकांच्या गळ्यातील ताईत बनतात; तर ‘हिंदू जीवनाची अडगळ आहे’ , म्हणणाऱ्याला ज्ञानपीठ दिले जाते. जागतिक पातळीवर भारत विश्वगुरू म्हणून वाटचाल करीत असताना अनेक परकीय शक्ती एकत्रितपणे संभ्रमावस्था निर्माण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वतः श्रीकृष्ण होऊन मनातील अर्जुनाला गीता ऐकवावी लागेल!”

गिरीश देशमुख यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. शैलेश भिडे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले