मराठवाड्यातील पुणे स्थित भूमी पुत्रांनी मराठवाड्याच्या विकासासाठी योगदान द्यावे : चंदन पाटील

0
383

पिंपरी चिंचवडमधील स्वयंसेवी संस्थांची बैठक संपन्न

पिंपरी, दि. ०३ (पीसीबी) – प्रतिनिधी : महिला सक्षमीकरण, मराठवाड्यातून होत असलेले स्थलांतर, यशस्वी युवा उद्योजक वाढविणे, महाविद्यालयिन विद्यार्थी विकास आणि शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असून, या माध्यमातून पुणे व पिंपरी-चिंचवड स्थित मराठवाडा वासियांनी योगदान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भारतीय किसान संघांचे चंदन पाटील यांनी केले.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून भारतीय किसान संघ प्रणित सावड मंचच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीचे आकुर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा जनविकास संघांचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, निवृत्त कृषी उपसंचालक पांडुरंग सिगेदार, कृषीतज्ज्ञ दिलीप बारडकर, सावड मंचाचे मराठवाडा समन्वयक शशिकांत गव्हाणे, सूर्यकांत कुरुलकर, शिवाजी डोंगरे, शंकर तांबे, राजेंद्र गाडेकर, श्रमिक गोजमगुंडे, वसंत आंग्रे, अमोल लोंढे, सुनील काकडे, प्रशांत फड, अनिल व्यास, धनाजी येळकर, किशोर अटरगेकर, गोरख भोरे, मारोती आवरगंड, बाबासाहेब सुकाळे उपस्थित होते.      

या बैठकीत मराठवाड्यातील समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. अरुण पवार यांनी सांगितले, की पिंपरी-चिंचवडमधील मराठवाडावासिय बांधव एकत्र येत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मराठावाड्यातील समस्यांवर आपआपल्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्वांनी एका मंचावर एकत्रित येण्याची गरज होती. नितीन चिलवंत यांनी महाराष्ट्र दिन आणि मराठवाड्याचं योगदान यावर मार्गदर्शन केले, तर दिलीप बारडकर यांनी मराठवाड्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले, तर शशिकांत गव्हाणे यांनी सावडची मराठवाड्यातील रचना सर्वांना समजून सांगितली. सूत्रसंचालन सुरेश कुलकर्णी यांनी, तर अनिल व्यास यांनी आभार मानले.