नृत्यकला मंदिरचा कै. रविकांत तुळसकर स्मृती सन्मान डॉ. संजीवकुमार पाटील यांना जाहीर

0
184

नृत्य समारंभाच्या सांगता समारंभात होणार सन्मान

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – निगडी येथील नृत्यकला मंदिर ट्रस्ट संचलित नृत्यतेज अकादमीच्या वतीने जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते कै. रविकांत तुळसकर स्मृती सन्मान पुरस्कार अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील, उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक पुरस्कार भक्ती नाईक, उत्कृष्ट युवा पुरस्कार आयली घिया, उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार आर्या कुलकर्णी यांना प्रदान केले जाणार असल्याची माहिती नृत्यकला मंदिराच्या संचालिका गुरू तेजश्री अडिगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

हा कार्यक्रम शनिवारी (दि. 29) सायंकाळी साडेपाच वाजता कै. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे होणार आहे. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, आमदार उमा खापरे, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. नंदकिशोर कपोते यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. रोख रक्कम व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या उन्हाळी नृत्य शिबिराची सांगता या यावेळी होईल. नृत्य शिबीर आयोजनाचे यंदाचे 22 वे वर्ष आहे. यावर्षीचा नृत्य महोत्सव गुरु तेजश्री अडिगे यांचे वडील नाट्य सिनेअभिनेते तथा निवृत्त न्यायाधीश कै. रविकांत तुळसकर यांना समर्पित केला आहे.

या शिबीरात 5 ते 60 वयोगटातील सहभागी झालेले 70 नृत्यकलाकार आपली कला सादर करणार आहेत. शिबिरामध्ये भारतीय लोकनृत्य व सेमी क्लासिकल नृत्य गुरु अडिगे, बॉलिवूड नृत्य अभिनेता मयुरेश पेम तर बेली डांस हा प्रकार साक्षी तांजे यांनी शिकवला.

पुरस्कार निवड समितीमध्ये नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर, निवेदिका नीरजा आपटे, लेखक / दिग्दर्शक देवेंद्र पेम, पत्रकार विवेक इनामदार यांचा समावेश आहे.