विभागांनी समन्वयांने काम करत मानीव अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेला गती द्यावी- अपर जिल्हाधिकारी अजय मोरे

0
198

पुणे, दि. २८ (पीसीबी): मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया ही सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तसेच त्यातील सर्व सदनिकाधारकांच्या फायद्याची बाब असून त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. विशेष मोहिमेत सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने अधिकाधिक संस्थांची मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले.

मानीव अभिहस्तांतरण प्रकरणाबाबत गठित जिल्हास्तरीय समितीची सभा अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी पुणे शहरचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय राऊत, नोंदणी विभागाचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सूर्यकांत मोरे यांचसह पुणे शहरमधील सहकारी संस्थांचे उपनिबंधक उपस्थित होते.

एकिकृत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याबाबत विचार मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया अधिक सुलभ व गतीमान होण्यासाठी सहकार, मुद्रांक व नोंदणी विभाग, महसूल, भूमि अभिलेख आदी सर्व संबंधित विभागांसाठी एकिकृत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. मोरे यांनी दिल्या.

सात- बारा किंवा मिळकत पत्रिकेवर फेरफार नोंद घेण्यापूर्वी नोटीसीची गरज नाही –

मानीव अभिहस्तांतरणाच्या आदेशानुसार नोंदणीकृत दस्ताच्या आधारे सात- बारावर किंवा मिळकत पत्रिकेत नोंदणी करण्यासाठी गृहनिर्माण संस्था तलाठी अथवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे अर्ज करतात. या प्रकरणात महसूल विभागातून फेर फार नोंद अभिलिखित व निर्गमित करण्यापूर्वी अशा मिळकतीमधील संबंधितांना पुन्हा नोटीस देण्याची आवश्यकता नाही. त्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील, असेही श्री. मोरे यांनी सांगितले.

पुणे शहरात सुमारे १९ हजार ५०० नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यापैकी सुमारे 2 हजार संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण किंवा विकसकाकडून हस्तांरण झालेले आहे. याव्यतिरिक्तच्या सुमारे साडेसतरा हजार संस्थांमधील ४० टक्के संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया झाली आहे. उर्वरित संस्थांबाबत सहकार विभाग प्रयत्नशील आहे. सहकार बरोबरच मुद्रांक व नोंदणी विभाग तसेच भूमि अभिलेख विभागाचाही यात महत्त्वाची भूमिका असून समन्वयाने कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी दिली,

दस्त नोंदणी वेळेस मुद्रांक व नोंदणी विभागाकडून सदनिकेच्या खरेदी- विक्रीच्या दस्ताची ‘चेंज ऑफ ॲग्रीमेंट’ ची होणारी मागणीच्या अनुषंगाने सदनिकांचा मुद्रांक शुल्क भरणा करण्यात आला असेल अशा ठिकाणी शासन निर्णयानुसार कार्यवाही अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने याबाबतची प्रक्रिया अधिक सुलभ व लोकाभिमुख करण्याच्यादृष्टीने उपाययोजना सुरु केली असून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल असे मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. हिंगाणे यांनी सांगितले.

या बैठकीस पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका विशेष नियोजन प्राधिकरणचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, पुणे शहरमधील उपनिबंधक सहकारी संस्था श्रीमती स्नेहा जोशी, नीलम पिंगळे, नागराथ कंजेरी, डी. एस. हौसारे, नारायण आघाव, डॉ. शीतल पाटील आदी उपस्थित होते.

अजय मोरे, अपर जिल्हाधिकारी – सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारती ज्या भूखंडावर उभ्या आहेत त्या भूखंडाची मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या नावे होण्यासाठी मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची तरतूद आहे. जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेमध्ये सहभागी होत मोहिमेचा लाभ घ्यावा.

संजय राऊत, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था-
मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची संख्या अतिशय कमी करण्यात आली असून संस्थांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रकरणे दाखल करावीत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मानीव अभिहस्तांतरणाचा आदेश व प्रमाणपत्र देणे हा एक टप्पा असून त्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनिर्णयाचा अंतिम आदेश देणे व त्यानुसार दुय्यम निबंधकांकडे दस्त नोंदणी केल्यानंतरच सात बारा किंवा मिळकत पत्रिकेत भोगवटदार म्हणून नाव लागते. त्यामुळे संस्थांनी दस्त नोंदणी व त्यापुढील प्रकियेलाही तितकेच महत्त्व द्यावे.