दुसऱ्याच्या यशात आनंद घेणे याला किंचित धक्का लागलाय – सुनंदन लेले

0
310

निगडी, दि.२७ (पीसीबी) – प्रत्येक खेळ आपल्याला काहीतरी शिकवीत असतो, ते दुसऱ्याच्या यशात आनंद घ्यायला शिकवितात सद्या हा स्थायीभाव कमी झालेला दिसतो,असे मत प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक- समालोचक श्री. सुनंदन लेले यांनी व्यक्त केले, मॉडर्न शैक्षणिक संकुल निगडी येथील वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प सादर करताना क्रिकेटने मला काय शिकविले या विषयावर ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे,नियामक मंडळ सदस्य,दिपक मराठे तसेच व्यासपीठासमोर नियामक मंडळ सदस्य मृगजा कुलकर्णी श्री उद्धव खरे, डॉ. प्रविण चौधरी,राजीव कुटे, रणजित हगवणे, प्रमोद शिंदे, आजीव सदस्य डॉ शशिकांत ढोले, डॉ अतुल फाटक,सतिश लिंभेकर,आदी उपस्थित होते.

सुनंदन लेले यांनी क्रिकेट खेळाने आयुष्यात काय शिकविले ते अनुभव दृकश्राव्य माध्यमाच्या साहाय्याने मांडले त्याला उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्या बरोबरचे मैत्रीचे किस्से अनेक प्रसंगांतून मांडले. पुढे बोलताना त्यांनी नेतृत्व गुणांसाठी आवश्यक गोष्टी, गुरू शिष्याचे महत्व, मोठ्या व्यक्तींचे गुणविशेष, जीवनात स्पर्धेचे,साधना, कष्ट सरावाचे महत्व पटवून दिले. पुढे विषय मांडताना त्यांनी सांगितले की जीवनातील यश अपयश गुणवत्तेवर अवलंबून नसते त्याबरोबर सातत्यपूर्ण कष्ट मेहनत याची आवश्यकता असते. पुढे ते म्हणाले की जीवनात यश अपयश अशा कोणत्याही परिस्थितीत मानसिक समतोल राखला पाहिजे, निर्णायक क्षणी योग्य वर्तन,सुसंवाद ठेवणे आवश्यक असते.

भारतीय संघातील विविध कर्णधार यांची उदाहरणे देताना त्यांनी नेतृत्व गुणाचे पैलू विषद केले, योग्य व्यक्तींना योग्य कामाची विभागणी, सकारात्मकता, सुसंवाद, मनाचा समतोल ठेवणे तसेच जेवढी स्पर्धा तेवढी संधी समजणे व अपेक्षांचे ओझे न मानता आशिर्वाद समजून दडपण व ताणतणाव यामध्ये आपले सर्वोत्तम सादरीकरण करणे हे महत्वाचे असते, याचबरोबर नेहमी आपला स्वभाव व संस्कार कायम ठेवून सतत पाय जमिनीवर असेल पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केले.

सचिन तेंडुलकर व त्यांचे गुरू रमाकांत आचरेकर सर यांचे विषयी बोलताना त्यांनी सांगितले की आचरेकर सरांनी सचिनचे कधीही फारसे कौतुक केले नाही प्रत्येक यशानंतर, पुढील वाटचाल व झालेल्या चुकांवर ते मार्गदर्शन करीत असे. ते नेहमी सांगत की आपले घरात कौतुक नाही झाले तरच बाहेर कौतुक होते, थोड्याशा यशाने हुरळून न जाता किंवा अपयशाने खचून न जाता आपला सराव मेहनत वाढविली तरच आपण स्पर्धेत टिकू शकतो हा संदेश त्यांनी यातून दिला. सूत्रसंचालन सौ वंदना धुमाळ यांनी केले प्रमुख पाहुणे परिचय सौ दीपा वायकोळे यांनी करवून दिला, तर आभार सौ सुजाता कुलकर्णी यांनी मानले.