मोहननगरमध्ये रस्त्यांची दुरवस्था; रस्त्यांचे डांबरीकरण करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांची मागणी

0
342

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर हे स्मार्ट, मेट्रो सिटी होत असतानाच चिंचवड मोहननगर येथील पंतप्रधान आवास योजना ते रामनगर समता मित्र मंडळ चौकापर्यंत कच्चा व अरूंद रस्ता आहे. तसेच या रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची लुटमार होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. भविष्यात नागरिकांच्या बाबतीत एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे या रस्त्यावर पथदिवे बसवून तत्काळ डांबरीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.

याबाबत विशाल काळभोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या म्हटले आहे की, शहराच्या विविध भागात कोट्यावधी रुपये खर्च करून सिमेंट रस्ते तयार केले जात आहेत. मात्र, मोहननगर येथील पंतप्रधान आवास योजना ते रामनगर समता मित्र मंडळ चौकापर्यंत आजही कच्चा रस्ता आहे. सुमारे 1 किलो मीटर रस्ता कच्चा असल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यांची मोठी गैरसोय होते. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल असतो. त्यामुळे या रस्त्याचे प्रलंबित काम महापालिकेने त्वरित हाती घ्यावे. तसेच रस्त्यावर पथदिवे बसवावेत, फुटपाथ तयार करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करावे.

याबाबत विशाल काळभोर म्हणाले, मोहन नगर परिसरात पंतप्रधान आवासची मोठी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या भागातील रस्त्यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यांच्या कामासाठी मी वेळोवेळी जनसंवाद सभेत आवाज उठविला आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी विशाल काळभोर यांनी केली आहे.