५० हजार रुपयांची लाच घेताना सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले

0
209

ठाणे, दि.२६ (पीसीबी): रायगड जिल्ह्यातील उरसोली, तालुका मुरूड येथील सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

मनिष महादेव नांदगावकर (वय 42, उरसोली, ता. मुरूड, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव असून त्याच्या विरोधात आदाड येथील एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती.

तक्रारदाराने उरसोली ग्रूपग्रामपंचायत हद्दीतील मौजे आदाड येथे गांडूळखत तयार करण्यासाठी शेड उभारली होती. या शेडची असेसमेंटला नोंदणी करण्यासाठी सरपंच मनिष महादेव नांदगावकर याने ७५ हजार रुपयांची लाच मागितली. वाटाघाटीनंतर ५० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. मात्र, त्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे संपर्क साधला. आज सरपंच नांदगावकर यास सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 50 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक शशीकांत पाडावे, पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे, पोलिस हवालदार अरूण करकरे, विनोद जाधव, महेश पाटील, पोलिस नाईक विवेक खंडागळे आणि जितेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे करीत आहेत.