बारामती, दि. २५ (पीसीबी) – मागील काही दिवसांपासून नर्तिका गौतमी पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आहे. ती अश्लील नृत्य करते, असा आरोप अनेकांनी केला असून तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणीही काहीजणांनी केली होती. या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही उडी घेतली होती. लावणी किंवा इतर कोणतेही कार्यक्रम सर्वांना पाहता येतील, अशा प्रकारे आयोजित केले पाहिजे. अशा कार्यक्रमांमध्ये अश्लील प्रकार घडता कामा नयेत, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती.
यानंतर आता अजित पवारांनी गावाकडील यात्रांचा उल्लेख करत गौतमी पाटीलबद्दल मिश्किल टिप्पणी केली आहे. ते बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी ‘नॉट रिचेबल’ असल्याबाबत बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांचेही कान टोचले. या कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना एका कार्यकर्त्याने जत्रेचा उल्लेख केला. तेव्हा अजित पवारांनी यात्रा वगैरे रात्री करायच्या, यात्रेत पाटीलबाईला बोलवायचं का? असं मिश्किल विधान अजित पवारांनी केलं.
“यात्रा असली तरी ती यात्रा रात्री आहे… रात्री कापाकापी… रात्री तमाशा… यात्रेत पाटीलबाईला बोलवायचं का रात्री? काय तिचं नाव? गौतमी….” असं विधान अजित पवारांनी केलं. “सगळ्यांना पाहता येईल, असं काम सगळ्यांनी करावं, एवढंच माझं म्हणणं आहे” असंही अजित पवार पुढे म्हणाले.
खरं तर, बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बारामतीत मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं. दरम्यान, त्यांनी एका कार्यकर्त्यांला उद्देशून गौतमी पाटीलबद्दल मिश्किल विधान केलं. अजित पवारांचं हे विधान सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.