सरकार कोसळण्याच्या मार्गावर अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस गावच्या जत्रेला

0
351

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या या सुट्टीबाबतची माहिती दिलेली नाही. एखादा मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या कारणास्तव तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर राज्य सरकार कोसळणार अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकड़े मुख्यमंत्री शिंदे सातारा जिल्ह्यातील आपल्या गावच्या जत्रेला गेल्याने चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन कर्मचार्‍यांना ते त्यांच्या गावी साताऱ्याला जात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 ते 26 एप्रिल दरम्यान तीन दिवस सुट्टीवर असल्याची माहिती आहे.
तीन दिवसांच्या सु्ट्टीत शिंदे त्यांच्या मुळ गावी साताऱ्याला गेले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राज्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्याही भूवय्या उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर जाण्याची अनेक कारणे चर्चेत आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर निकाल लवकरच येणार आहे. या निकालावर अनेक गोष्टी निर्भर आहेत. कारण जर निकाल शिंदेच्या बाजूने लागला तर राज्यात असलेले सरकार कायम असणार आहे. जर निकाल एकनाथ शिंदे यांच्याविरोधात लागला तर शिंदे गटासाठी मोठा धक्का असणार आहे. तर निकाल आपल्याच बाजूने लागावा यासाठी देखील शिंदे देवाला साकडं घालण्यासाठी गेल्याच्या चर्चा सुरू आहेत.

तर राज्यातील सरकार कायम राहावं यासाठी भाजप प्लॅन बी करत आहे त्यामध्ये अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भाजपने अजित पवारांना सोबत घेण्याची चर्चा कदाचित शिंदे यांना पटली नसावी, त्यामुळे ते काही दिवस सुट्टीवर असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान राज्यात सुरू असणाऱ्या घडामोडींवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. खारघर दुर्घटनेत 14 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. त्याचबरोबर आता चर्चेत आलेला रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प यामुळेही स्थानिक आणि विरोधक आक्रमक झाल्याचे दिसुन येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत चालला होता. याच दबावातून देखील ते रजेवर असल्याची चर्चा होत असून विविध तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.