राजकारणात काहीही होऊ शकतं, इथे कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कुणीही शत्रू नसतो – नाना पटोले

0
358

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – राज्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ सुरु झाल्याचं दिसत आहे. याबाबत खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच भाष्य केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, नाना पटोले म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकतं. इथे कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कुणीही शत्रू नसतो. मोदी है तो मुमकिन है. असं सूचक वक्तव्यही नाना पटोले यांनी केलं आहे. तसेच, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारला असता, तिन्ही पक्षांकडे आपापले उमेदवार आहे. पण भविष्यात राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार, असा दावा विश्वासही नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. सध्या कोणतीही निवडणूक नाही, पण जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. असं उत्तर नाना पटोले यांनी दिलं. त्याचवेळी महाराष्ट्रात यावेळी काँग्रेस नंबर वनचा पक्ष असेल. काँग्रेस सर्वाधिक आमदार निवडून येतील आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

याचवेळी त्यांनी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या घटनेवरुनही थेट केंद्रीय मंत्री अमित शहांवर टिकास्त्र डागलं आहे. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाहांची एसीमध्ये सोय केली होती. पण महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात आलेली जनता मात्र उन्हात बसली होती. 12 वाजता पहिला मृत्यू होऊनही कार्यक्रम चालू होता. लोकांचा जीव गेला तरी यांना काही फरक पडत नाही. सरकार मृतांचा आकडा कमी दाखवत आहे. पण चेंगराचेंगरीमुळे काही लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने नेमका आकडा जाहीर करावा, अशी मागणीही नाना पटोलेंनी केली आहे.