भंयकर… येशुला भेटायचे म्हणत उपास करायला लावले, ४७ जणांनी गमावले प्राण

0
309

आफ्रिका, दि. २४ (पीसीबी) – आफ्रिकेतील केनिया देशात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका ख्रिश्चन पादरीच्या मालकीच्या जमिनीत खोदकाम करत असताना ४७ मृतदेह सापडले आहेत. यामध्ये लहान मुलांचे मृतदेह देखील आहेत. या पादरीवर आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी त्याच्या अनुयायांना उपाशी राहण्यासाठी प्रेरित केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी पादरीला अटक केली आहे. हे प्रकरण मालिंदी शहरातील आहे.

केनियाच्या पूर्वेकडील मालिंदी येथील गुन्हे अन्वेशन विभाघाचे प्रमुख चार्ल्स कामाऊ म्हणाले की, “आज आम्ही आणखी २६ मृतदेह बाहेर काढले आहेत, त्यामुळे आता घटनास्थळावरून मिळालेल्या एकूण मृतदेहांची संख्या ४७ वर पोहोचली आहे.” कामाऊ यांनी सांगितलं की, “आम्ही आणखी मृतदेहांचा शोध घेत आहोत, त्यासह या पादरीपासून वाचलेल्या लोकांचाही शोध घेत आहोत.” गेल्या आठवड्यात येथे एक मृतदेह सापडला होता. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी या शोध माहीमेसाठी मालिंदीमधील शाकाहोला येथील ८०० एकर (३२५ हेक्टर) जंगल सील केलं आहे. दरम्यान, गृहमंत्री किथुरे किडिकी यांनी घोषणा केली आहे की, ते मंगळवारी घटनास्थळाची पाहणी करतील. याप्रकरणी पोलिसांनी चर्चचा पादरी मॅकेन्जी नथेंग याला अटक केली आहे. केनियातलं वृत्तपत्र द स्टँडर्डने म्हटलं आहे की, पॅथोलॉजिस्ट डीएनएचे नमुने घेतील आणि तपास करतील की, या लोकांचे मृत्यू उपाशी राहिल्याने झाले आहेत की इतर कुठल्या कारणाने.

पादरी मॅकेन्जी नथेंगवर आरोप आहे की, त्याने येशूशी भेटण्यासाटी त्याच्या अनुयांना उपाशी राहण्याचं आवाहन केलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी नथेंगच्या सहा आणखी अनुयायांना ताब्यात घेतलं आहे. नथेंगमुळे ४७ लोकांनी आपला जीव गमावला असल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे केनियात मोठी खळबळ उडाली आहे.