अजित पवार यांची दिलखुलास मुलाखत शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर, दादा भाजपकडे झुकलेत का ?…

0
320

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – राज्य विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची `दिलखुलास दादा` मुलाखत दै. सकाळ ने आयोजित केली होती. सव्वा तासाच्या मुलाखतीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मुलाखतीत “होय, मला मुख्यमंत्री व्हायचंय;२०२४ कशाला आत्ताही तयार आहे“ या त्यांच्या विधानाने राजकारणाची दिशा स्पष्ट झाली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकार समजेपर्यंत त्यांची खुर्ची जाईल“, असेही अगदी मनमोकळेपणाने दादांनी सांगितल्याने लोकांना काय समजायचे ते समजले.दादा थोडेसे भाजपकडे झुकलेत का, अशीही चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली.

खासदार सुनिल तटकरे यांनी थेट, तर आमदार अशोक पवार अप्रत्यक्षपणे दादांना `मुख्यमंत्री` पहायला आवडेल, असे म्हणत टाळ्या घेतल्या. एकूणच काय तर गेले आठवडाभर ज्या काही राजकीय हालचाली, गाठीभेटी, बातम्या सुरू आहेत त्यावर दादांनी एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले. आजवर राज्यात जे जे उपमुख्यमंत्री झाले त्यापैकी एकालाही मुख्यमंत्री होता आलेले नाही, मात्र चार वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा उद्याचे मुख्यमंत्री असणार हे आता जवळपास निश्चित समजायला हरकत नाही. दादा आता किती तयारीने उतरलेत हे पाहिल्यावर राष्ट्रवादीमधील दादा समर्थकांना गुदगुल्या झाल्या. संभ्रमावस्थेत असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उभारी मिळाली. पाच वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्तासुध्दा आतून सुखावला. खरोखर, उद्याच्याला अजित पवार हे मुख्यमंत्री झालेच तर पिंपरी चिंचवड महापालिकेत `अब की बार १०० पार`ची वल्गना हवेत विरणार याची चिंता भाजपच्या आमदार, कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. अजितदादांची संपूर्ण मुलाखत ज्यांनी पाहिली त्यांना दादा हे आता जरासे नव्हे तर बऱ्यापैकी भाजपकडे झुकले की काय, अशी शंका येते.

नरेंद्र मोदींना पर्याय नाही, फडणवीस वैरी नाहीत –
अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा, कार्यशैलीची वेळोवेळी वाहव्वा केली आहे, या मुलाखतीतसुध्दा अजितदादांचे मोदी प्रेम चर्चेचा विषय ठरले. “ २०२४ मध्ये सुध्दा मोदीच्या नंतरचे नाव समोर दिसत नाही. २०१४ व २०१९ मध्ये मोदींचा करिष्मा चालला, निवडणुकित भाजपला मोठे यश मिळाले.“ मुलाखतकारांनी खोदून खोदून विचारले तरी मोदींना पर्याय अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, शरद पवार किंवा राहुल गांधी या पैकी एकही नाव अजितदादांना समोर दिसले नाही. अगदी रोखठोक शैलीत त्यांना, “वेळ आल्यावर मी सांगतो“ म्हणत त्यांनी आणखी गूढ वाढवले.
देवेंद्र फडणवीस आणि आपली निखळ मैत्री असल्याचे प्रांजळपणे मान्य करताना ते म्हणाले, फडणवीस यांच्याबाबत मी सॉफ्ट नाही, जेव्हढा विरोध करायचा तेव्हढा करतो, शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री होती, पण भाषण सुरू केल्यावर ठाकरे पवार यांना कोणत्या भाषेत बोलतात हे आपण पाहिले. यशवंतराव चव्हाण आणि आचार्य अत्रे एकमेकांवर तुटून पडायचे, पण कधी एकमेकांवर रागावले नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही परंपरा आहे, असे म्हणत अजितदादांनी आपल्या मैत्रीचे दिलखुलास समर्थन केले.

`दादागिरी` ची भाषा म्हणजे…
“कोणाला मस्ती आली तर; ती जिरवण्याची ताकद आपल्यात आहे“ ही दादांची दादागिरीची भाषा लोकांना खूप भावली. “लोकांचे काम होत असेल तर ताबडतोब करायचे आणि नसेल तर तोंडावर नाही म्हणायचे,“ स्पष्ट भूमिका असेल तर लोकांना आवडते, हे विधानसुध्दा भावले. निधड्या छातीने बोलायचे, त्यात काय घाबरायचे, हा त्यांचा सल्ला तमाम कार्यकर्त्यांना खूप रुचला.

पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलला –
पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा कसा बदलला ते एका एका प्रकल्पाचे नाव घेऊन त्यांनी सांगितल्याने उपस्थित दादा समर्थक जाम सुखावले. होय, मला `मुख्यमंत्री` व्हायचंय ; आताही !!! या पॉझवर दादांना मिळालेला टाळ्यांचा प्रतिसाद खूप बोलका होता. आजवर पालकमंत्री, पाटबंधारे मंत्री, वित्त मंत्री अशी खाती सांभाळणारे दादा मुख्यमंत्री झालेच तर काय, या भावनेनेच सगळे खूश आहेत. २०१७ मध्ये ६०-७० नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने भाजपची सत्ता आली होती, आता दादा मुख्यमंत्री झालेच तर गेलेले बहुतांश नेते, कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परत येतील. महापालिकेतून हद्दपार झालेली राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येईल.

पिंपरी राखीवची आमदारकी राखता येईल आणि भोसरी, चिंचवडमध्ये सुध्दा राष्ट्रवादीचाच आमदार दिसेल. खासदार डॉ.अमोल कोल्हे कदाचित राष्ट्रवादी सोडून गेले तरी शिरुरची जागा सहज पुन्हा मिळवणे सोपे होईल. मावळ लोकसभा मतदारसंघ तीन वेळा शिवसेनेकडे गेला, मात्र आता तोसुध्दा जिंकणे आवाक्यात येईल. साथ दिली तर दादांचे चिरंजीव पार्थ पवार हेसुध्दा येथून पुन्हा खासदार होतील आणि मागच्या पराभवाचे उट्टे भरून काढतील. थोडक्यात काय तर दादा मुख्यमंत्री होण्याची लक्षणे दिसतात, काळ-वेळेने साथ दिली तर ते राष्ट्रवादीचे पहिले मुख्यमंत्री होतील आणि तसे झालेच तर शहरातील राष्ट्रवादीला पुन्हा सोन्याचे दिवस येतील, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळेच दै. सकाळ ची मुलाखत वाजली, गाजली, मात्र ती सर्वाधिक मरगळ आलेल्या राष्ट्रवादीच्या पथ्यावर पड़ली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.