पिंपरी, दि. २० (पीसीबी) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, राष्ट्रवादी फुटणार, अजित पवार भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री होणार आदी बातम्या आठवडाभर सुरू होत्या. स्वतः पवार यांनी त्याबाबत स्पष्ट खुलासा केला, मात्र त्यानंतरही त्यांच्या भोवती दाटलेले मळभ कायम आहे. आता दै. सकाळ तर्फे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित प्रकट मुलाखतीत अजित पवार काय बोलणार याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
सहा वेळा आमदार, एकदा खासदार, चार वेळा उपमुख्यमंत्री तसेच अर्ध्या अधिक खात्यांचा कारभार पाहिलेले अजित पवार यांच्याभोवती सद्या सगळे कॅमेरे फिरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर शिंदे – फडणवीस सरकार कोसळेल आणि राष्ट्रपती राजवाट सुरू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ पैकी ४० आमदार जेष्ठ नेते अजित पवार यांच्याबरोबर येतील आणि पुन्हा नवीन सरकार स्थापन कऱण्याची व्युहरचना भाजपकडून सुरू असल्याच्या बातम्यांनी राजकारण ढवळून निघाले.
दरम्यान, तसे काही होणार नाही, मी मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा खुलासा स्वतः अजित पवार यांनी केला. त्यानंतरही दादांची ही भूमिका हा पूर्णविराम नाही, तर स्वल्पविराम असल्याचे निष्कर्ष निघाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर सत्य समोर येईल, अशीही अटकळ माध्यमकर्मींनी व्यक्त केली आहे. आता या सर्व घटनांमध्ये खरे काय खोटे काय यावर अजित पवार दै. सकाळ च्या प्रकट मुलाखतीत बोलतील, अशी अपेक्षा आहे. दै. सकाळचे संपादक सम्राट फडणीस आणि कार्यकारी संपादक शितल पवार या मुलाखत घेणार आहेत.