मुंबई, दि. १८ (पीसीबी) – मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ते १५ आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार किंवा अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला पाठिंबा देणार अशा चर्चा सुरू होत्या. शिवसेना आणि ठाकरे गटाच्या संघर्षाचा निकाला लवकरच लागणार असून त्यामुळे या घडामोडी घडत असल्याचा सर्वांचा समज होता, मात्र भाजपच्या राज्यातील ऑपरेशन लोट्सचे वेगळेच कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजपने राज्यात ऑपरेशन लोट्स सुरू केलं आहे. त्यामुळे अजित पवार, भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरू झाल्या असून भाजपची नजर काँग्रेसमधील बड्या नेत्यांवरही आहे. याचे कारण म्हणजे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे दिलेला अहवाल असल्याचं समजतं.
विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपकडून तीन सदस्यीय समिती स्थापन कऱण्यात आली होती. या समितीने संपूर्ण भारतातील लोकसभा जागांबाबतची स्थिती काय आहे, याचा अहवाल सादर केला. मात्र महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबतचा तावडे समितीचे अहवाल चिंताजनक आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला तब्बल ४२ जागा मिळाल्या होत्या. मात्र २०२४ मध्ये या जागा कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०२४ मध्ये भाजप-शिंदे गटाच्या २२ ते २५ पेक्षा कमी जागा निवडून येतील, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे.