क्रांतिवीर चापेकर हुतात्मा दिनानिमित्त भव्य अभिवादन फेरी संपन्न

0
222

पिंपरी,दि. १८ (पीसीबी) – भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि १८ एप्रिल या दामोदर हरी चापेकर यांच्या हुतात्मादिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने सोमवार, दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६:०० ते रात्री ९:०० या कालावधीत भव्य अभिवादन फेरीचे आयोजन केले होते. चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् पासून अभिवादन फेरीचा प्रारंभ करण्यात आला.‌ केशवनगर शाळा, काकडे पार्क, श्री शिवाजी उदय मंडळ, प्रदीप स्वीट्स, पॉवरहाउस चौक, क्रांतिवीर चापेकर चौक, गांधी पेठ या मार्गाने क्रमण करीत क्रांतितीर्थ चापेकर वाडा येथे फेरीचा समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी आमदार अश्विनी जगताप, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, अॅड. मोरेश्वर शेडगे, शीतल शिंदे, नामदेव ढाके, पद्मश्री गिरीश प्रभुणे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सहकार्यवाह रवींद्र नामदे, नितीन बारणे, मिलिंद देशपांडे, हेमंत हरहरे, माहेश्वर मराठे, नितीन वाटकर, धनंजय गावडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.‌

भारतमाता चित्ररथ, ५०० फूट लांबीची तिरंगा पदयात्रा, मशाल मिरवणूक, रॅण्डवध देखावा, चापेकर बंधूंच्या जीवनाविषयी ५ चित्ररथ, मुलींचे ढोलताशा पथक, मुलींचे लेझीम पथक, तुतारी आणि सनईचौघडा पथक, लोककलावंत हलगी पथक, जनजाती क्रांतिकारक पथक आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके अशा विविध आकर्षणांचा समावेश असलेल्या अभिवादन फेरीला समाजातील विविध मान्यवर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून, रांगोळ्या काढून तसेच पंचारती ओवाळून, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत फेरीचे स्वागत करण्यात आले. यानिमित्त क्रांतितीर्थावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.‌

लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय – थेरगाव, खिंवसरा पाटील विद्यामंदिर – थेरगाव, क्रांतिवीर चापेकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय – चिंचवड, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् – चिंचवड या शाळांमधील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहात फेरीमध्ये सहभागी झाले होते. मातृसेवा संस्थेच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती.

अभिवादन फेरी प्रमुख गतिराम भोईर, तेजस चवरे, संजय कुलकर्णी, अविनाश अगज्ञान, शाहीर आसराम कसबे, नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर, पूनम गुजर, वासंती तिकोणे, वर्षा जाधव, योगिनी शिंदे, मारुती वाघमारे, सतीश अवचार, अतुल आडे, हर्षदा धुमाळ, दीपाली शिंदे यांनी संयोजनात परिश्रम घेतले.