“एकदम कडक ट्रेलर, टीडीएम सुपरहिट होणार…”, टीडीएमच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून मिळतोय प्रतिसाद

0
218

‘टीडीएम’च्या ट्रेलरला सिनेरसिंकाकडून भरभरून प्रतिसाद, विदर्भ कन्या कालिंदीच्या डायलॉग्जवर लाखो तरुण घायाळ

TDM Trailer :  राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे ‘टीडीएम’ हा मराठी चित्रपट घेऊन आले आहेत. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरने सिनेरसिकांची उत्सुकता वाढवली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘टीडीएम’चा ट्रेलर रिलीज झाला असून या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांकडून ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

बुधवार (१२ एप्रिल) रोजी ‘टीडीएम’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून अवघ्या काही दिवसांतच ट्रेलरला लाखो व्ह्यूज आले आहेत. नवोदित कलाकार पृथ्वीराज थोरातचा अष्टपैलू अभिनय आणि अभिनेत्री कालिंदी निस्तानेच्या देखण्या रुपाची प्रेक्षकांना भुरळ पडली. ‘विदर्भ कन्या’ कालिंदीच्या अदा आणि ट्रेलरमधील तिच्या डायलॉग्जनी हजारो तरुणांच्या हृदयात प्रेमाच्या कळी खुलू लागल्या आहेत. परिणामी विदर्भातून ‘टीडीएम’च्या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. 

“एकदम कडक ट्रेलर, टीडीएम सुपरहिट होणार”… “आता आतुरता फक्त TDM ची, राडा तर होणारच ना अन् तो करणार पण TDM च ना”… “भाऊसाहेब कऱ्हाडेंची नवीन कथा पहावीच लागेल, वास्तव्याशी नाळ पुन्हा एकदा जोडावीच लागेल, आतुरता २८ एप्रिल ची”… अशा प्रतिक्रिया मराठी सिनेमा चाहत्यांकडून ‘टीडीएम’च्या ट्रेलरवर आल्या आहेत. तर पृथ्वीराज आणि कालिंदीचे डायलॉगही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. टीडीएमच्या ट्रेलरखाली “बघतुय एकीकड आणि चालतुय एकीकड होपलेश, पळ तिकड”… अशी कमेंट करणाऱ्या कालिंदीच्या चाहत्यांचीही संख्या मोठी आहे. तर पृथ्वीराजचा “जब जिंदगी झंड होती है, तो पुणा मुंबईही याद आती हे”… या डायलॉगने लाखो तरुणांना आपलंस केलं आहे. 

‘टीडीएम’मधील गाणी आणि ट्रेलरला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर आता २८ एप्रिलला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे. हा सिनेमा हिट होणार आणि मराठीतील सिनेइंडस्ट्रीत अनेक नवे रेकॉर्ड  तयार करणार अशी चिन्हे दिसत आहेत.