अजित पवार मुख्यमंत्री झालेच, तर भाजप आमदार महेश लांडगे यांची होणार मोठी कोंडी

0
255

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर खूप मोठी उलथापालथ होणार असल्याच्या बातम्या सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निर्णयानंतर शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील आणि राज्य सरकार कोसळेल, अशी शक्यता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे ३० आमदार मिळून नवीन सरकार स्थापन होणार… स्वतः अजित पवार मुख्यमंत्री होणार आणि भाजपकडून पुन्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार, अशीही वदंता आहे… राज्यात दोन मोठे भूकंप होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर सांगतात… तर अजितदादा भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात… राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या फक्त संमतीची अजितदादा प्रतिक्षा करत असल्याचेही वृत्त आहे.

अजितदादा पवार हे दोन दिवस या सर्व घडामोडिंचा केंद्रबिंदू आहेत असून ते प्रसिध्दीच्या झोतात आहेत. मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे २० आमदार मंत्रीमंडळात असतील, अशीही चर्चा आहे. दरम्यान, खरोखरच शिंदे गेले आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून आरूढ झालेच तर काय, यावरही आता खल सुरू झाला आहे. त्यातल्या त्यात अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात मागच्या निवडणुकित एकेरी भाषेत टीकाटिप्पणी करणाऱ्या भाजप आमदारांचे धाबे दणानले आहे.

गेल्या वर्षा सहा महिन्यांत भोसरीकर आमदार महेश लांडगे यांच्या सोशल मीडिया टीमने अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्यावरसुध्दा अत्यांत खालच्या भाषेत नको त्या शब्दांत काही पोस्ट व्हायरल केल्यात. आता दादा जर का राज्याचे मुख्यमंत्री झालेच आणि तेसुध्दा भाजपच्या बरोबरीने तर आपली काय धडगत नाय, अशी धास्ती आमदार लांडगे यांना लागून राहिली आहे. काय आहेत त्या पोस्ट यावर जरा आपण नजर टाकू म्हणजे आमदार लांडगे यांना का धडकी भरली त्याचा खुलासा होईल.
पहिली पोस्ट आहे…

१) महाराष्ट्राचे स्वयंघोषित दादा –
`महाराष्ट्राच्या स्वयंघोषित दादा ला चिंचवड मतदारसंघात टू व्हिलरवर फिरायला भाग पाडले आमच्या महेशदादांनी… समजलं कां आमच्या महेशदादांची ताकद…, नाद करा पण महेशदादांचा नाय…` ही पोस्ट आहे आमदारांच्या कट्टर समर्थक माजी नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांची…
२) जनता आता राष्ट्रवादीला धडा शिकविणार – `मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रवादी तोंडावर आपटली… इंद्रायणीनगर, धावडेवस्तीचे पाणी रोखणाऱ्या राष्ट्रवादीला जनता माफ करणार नाही…` अशा आशयाच्या या पोस्टमध्ये अजित पवार हे पाण्याच्या टाकीवर टिकाव मारून टाकी फोडत असल्याचे दृष्य आहे. त्यातील अजित पवार यांच्या व्यंगचित्रामुळे ते अधिक व्हायरल झाले. आमदारांचे लांडगे यांचे धाकटे बंधू कार्तिक लांडगे यांनी ही पोस्ट टाकल्याने आता त्यांचीसुध्दा चिंता वाढली आहे.
३) साडेतीन जिल्ह्याचे पंतप्रधान –
`साहेब आता आपण युक्रेनवर लक्ष्य केंद्रीत करायला पाहिजे, तिथे पंतप्रधान पदाची खुर्ची रिकामी होई शकते, असे कुच्छितपणे सुनावणाऱ्याने शरद पवार यांना `साडेतनी जिल्ह्यांचे पंतप्रधान` – विशेष म्हणजे लाचलुचपत प्रकऱणात रंगे हात सापडलेले माजी नगरसेवक नितीन लांडगे यांच्यासह १०३ लोकांनी ही पोस्ट लाईक केली असून आमदारांचे बंधू कार्तिक लांडगे यांनी ती व्हायरल केली आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडूक प्रचारा दरम्यानच्या यो पोस्ट सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. त्यातल्या त्यात जाहीर भाषणात अजित पवार यांची संभावना कऱणारे आमदार महेश लांडगे यांची कुचंबना झाली आहे. फडणवीस यांच्या मदतीने मंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या भोसरीकर आमदार महेश लांडगे यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. आता साधे राज्यमंत्रीपदसुध्दा मिळण्याबाबत साशंकता आहे.

अजितदादा मुख्यमंत्री झालेच तर आगामी महापालिका निवडणुकीतसुध्दा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी मिळेल आणि कदाचित सत्तासुध्दा मिळेल. भाजप शहराध्यक्ष म्हणून आमदार महेश लांडगे यांचीही सत्वपरिक्षा आहे. घोडेमैदान जवळ आहे.