५९० कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डीएसके विरोधात सीबीआयचे दोन गुन्हे

0
250

पुणे, दि. १४ (पीसीबी) – ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरोधात सीबीआयने दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी स्टेट बँक, सेंट्रल बँक व अन्य काही बँकांची मिळून एकूण 590 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कंपनीतील संचालक मंडळाच्या सदस्यांवरही गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, विजया बँक यांनी डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला एकूण 650 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. दिलेल्या कर्जापैकी 433 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी थकवले आहे. या प्रकरणी पाहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्हा हा डी. एस. के. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लि. या कंपनीविरोधात दाखल करण्यात आला आहे. कंपनीने अंदाजे 156 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डिझायनिंग, गेमिंग, ॲनिमेशन आदींचे प्रशिक्षण देणारी ही कंपनी होती.

कंपनीने आपल्या ताळेबंदात नमूद केले आहे की कंपनीच्या कमाईपैकी 60 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करण्यात आली आहे. कंपनीला ज्या उद्देशासाठी कर्ज दिले होते त्याऐवजी कंपनीने कर्जातून मिळालेली रक्कम मूळ कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरली असल्याचे दिसून आले. स्टेट बँकेने फोरेन्सिक ऑडिट केले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार त्यांनी व्हेंडर कंपन्यांसोबत केल्याचे दाखविले. मात्र, ज्या कंपन्यांना त्यांनी हे पैसे दिल्याचा दावा केला, त्या कंपन्यांचा पत्ता हा डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीच्याच ठिकाणाचा आहे. असे दिसून आले आहे.