उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य – देवेंद्र फडणवीस

0
187

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणं बाकी आहे. त्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता हे मोठं भाकीत देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आज मुंबई तकच्या बैठक कार्यक्रमात आले होते. त्याच कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचे कसे पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
“ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे त्यांच्या हे लक्षात आलं असेल की उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. त्यांचं सरकार परत येऊ शकणार नाही. मी वकील आहे. मी हे सांगू शकतो की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हे त्यांना परत आणून बसवणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणं योग्य राहणार नाही. जी आमची भूमिका आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की निकाल योग्य पद्धतीने लागेल.

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील
आजच माझं भाकीत सांगतो की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ. त्यामुळे हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कुठलाही बदल होणार नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नितीश कुमार सोडून जातील असं वाटलं नव्हतं
नितीश कुमार यांच्याशी माझी चर्चा झाली होती. मात्र ते सोडून जातील असं वाटलं नव्हतं. महाराष्ट्रातलं सरकार बदलल्यानंतर नितीश कुमार यांनी आमची साथ सोडली. मात्र ते सोडून गेलेच. राजकारणात या गोष्टी घडतात असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच पहाटेच्या शपथविधीबाबत पूर्ण सत्य सांगायची वेळ अजून यायची आहे. राजकीय संबंध वेगळे असतात, वैयक्तीक संबंध वेगळे असतात. दक्षिणेसारखी दुश्मनी महाराष्ट्रात सुदैवाने नाही. महाराष्ट्रातले नेते एकमेकांचा विरोध करत असतात, पण ते चहा पिऊ शकतात सोबत, गप्पा मारू शकतात असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.