मुंबई, दि. १३ (पीसीबी) – शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. “ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर आधी ईडीची कारवाई करून अटकेची भीती दाखवली, तशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही ईडी कारवाई होत आहे. तोच प्रयोग राष्ट्रवादीबरोबर सुरू आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते गुरुवारी (१३ एप्रिल) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
संजय राऊत म्हणाले, “शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं हे शिवसैनिकाचं वर्णन असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढीत शौर्य होतं. यांना दाढी असेल तर ते शौर्य यांनी दाखवलं पाहिजे. मात्र, ते घाबरून गेले आणि इतरांनाही घाबरवलं.”
“एकनाथ शिंदे म्हणाले होती की, मला अटकेची भीती वाटते”
संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना अटकेची भीती वाटत असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी जे सांगितलं ते सत्य आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर येऊन ‘मला तुरुंगात जायचं नाही, मला अटकेची भीती वाटते’ सांगितलं होतं. त्यांनी अशाप्रकारची चर्चा याच माझ्या मैत्री बंगल्यावर येऊन माझ्याशीही केली होती.”
“मी शिंदेंना सांगितलं की, माझ्यावरही असा प्रसंग येईल, पण…”
“तेव्हा आम्ही त्यांना वारंवार समजावत होतो की, आपण प्रसंगाला सामोरं जावं. आपण लढणारे लोक आहोत, आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारस आहोत. मी त्यांना सांगितलं की, माझ्यावरही असा प्रसंग येईल, मला अटक करतील अशी भीती आहे. मात्र, मी अटकेच्या तयारीत आहे,” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.