भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबार करणाऱ्या एका संशयिताला लष्कराने घेतले ताब्यात; तर ४ जवान शहिद

0
243

पंजाब, दि. १३ (पीसीबी) – भटिंडा मिलिटरी स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जवान ठार: पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जवान शहीद झाले. लष्कराने सांगितले की, हा परिसर सील करण्यात आला आहे आणि “या प्रकरणातील तथ्य तपासण्यासाठी पंजाब पोलिसांसोबत संयुक्त तपास केला जात आहे.” लष्कराने ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. वृत्तानुसार, तोफखाना युनिटमध्ये गोळी लागल्याने लष्कराच्या चार जवानांचा मृत्यू झाला. याशिवाय अन्य कोणतीही दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे लष्कराच्या मुख्यालयाच्या दक्षिण पश्चिम कमांडने एका निवेदनात म्हटले आहे.

लष्कराने निवेदनात काय म्हटले आहे?

सूत्रांनी सांगितले की, सैनिकांना मारणाऱ्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी लष्कराने सर्व्हिस हेक्साकॉप्टर्स आणि ड्रोनचा वापर केला आहे. सूत्रांनी सांगितले की, स्थानकावर नाकाबंदी आणि शोध मोहीम सुरू असून रहिवाशांच्या अनावश्यक हालचालींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
तत्पूर्वी, मुख्यालय दक्षिण पश्चिम कमांडने सांगितले होते की स्टेशन द्रुत प्रतिक्रिया पथके सक्रिय करण्यात आली आहेत आणि शोध मोहीम सुरू आहे. त्याचवेळी, एपीबी न्यूजनुसार, भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबार करणाऱ्या एका संशयिताला लष्कराने ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

दहशतवादी घटना घडण्याची शक्यता नाकारली

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, भटिंडाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) गुलनीत सिंग खुराना यांनी पुष्टी केली की “काहीतरी” घडले आहे, परंतु लष्कराने अद्याप तपशील शेअर केलेला नाही. ते म्हणाले की लष्कराकडून अंतर्गत शोध मोहीम सुरू आहे. एसएसपी खुराणा म्हणाले की, हा दहशतवादी हल्ला नव्हता आणि लष्करी ठाण्यामध्ये काही अंतर्गत घडामोडी झाल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी स्टेशनच्या आर्टिलरी युनिटमधून काही शस्त्रे गायब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. हरवलेली शस्त्रे शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.