पुलाखाली मशिनरी नेणारा ट्रेलर अडकल्याने ट्राफिक झाले जाम ! महापालिकेचा निकृष्ट कारभार चव्हाट्यावर

0
258

आकुर्डी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निकृष्ट कारभाराचे नमुणे पावला पावलावर सापडतात. महापालिका भवना समोर पुणे- मुंबई महामार्गावर बांधलेला समतल वितलग म्हणजेच अंडरपास. या पुलाची उंची अपेक्षेपेक्षा कमी असल्याने कंटेनर, डंपर, मोठ मोठी मशिनरी वाहून नेणारे ट्रेलर पुलाखाली अडकतात. गेल्या १५ वर्षांत सुमारे ३५ वेळा अशा घटना घडल्या. त्यावर उपाय म्हणून पुलाच्या सुरवातीलाच ठरावीक उंचीचे लोखंडी बार लावले. त्यानंतरच्या काळात अशा दुर्घटना बंद झाल्या.

पुलाची उंची कमी असल्याने त्यातून जाऊ शकणाऱ्या वाहनांनाच या मार्गाने जाता येते. आता अशाच प्रकारच्या घटना आकुर्डी येथील भूमीगत मार्गात म्हणजेच समतल वितलग मध्ये घडत आहेत. तिथेही उंची कमी असल्याने मशिनरी वाहून नेणारे मोठ मोठे कंटनेर, ट्रेलर अडकतात. बुधवारी रात्री अशाच प्रकारचा कंपनीची मशिनरी दुसऱ्या शहरात नेणारा ट्रेलर अडकून बसला. सहा-सात तास वाहतूक कोंडी झाली. पुलाखाली मशिनरी अडकल्याने या पुलाचेही काही अंशी नुकसान झाले. पिंपरी येथील पुलाखाली असे कंटनेर, ट्रेलर अडकून पुलाचे कठडे तुटले आहेत. या दुर्घटना थांबविण्यासाठी तत्काळ उपाय करण्याची मागणी होत आहे.