गणेश तलाव वाचवा, प्राधिकरणाचे सौंदर्य टिकवा

0
369

– निगडी प्राधिकरणातील नागरिकांचे लाक्षणिक उपोषण, गाळ काढण्यास टाळाटाळ आणि दुरावस्थेमुळे संताप

आकुर्डी, दि. १२ (पीसीबी) – निगडी प्राधिकरणातील गणेश तलावाची दुरावस्था झाली आहे. याकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून तलावातील गाळ काढला जात नसल्याच्या निषेधार्थ प्राधिकरणातील नागरिकांनी आज, मंगळवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. “गणेश तलाव वाचवा, प्राधिकरणाचे सौंदर्य टिकवा”, असा नारा देत प्राधिकरणवासीयांनी संताप व्यक्त केला.

गेल्या तीन वर्षांपासून गणेश तलावामधील गाळ काढण्यात आलेला नाही. तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. येथे राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्राधिकरणातील एका सुंदर स्थळाची दुरावस्था होत आहे. मनपा प्रशासनाला याची चिंता नाही. त्यामुळे प्राधिकरणातील गणेश तलाव मित्र मंडळाच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण केले.

या उपोषणस्थळी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे व पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी भेट देत नागरिकांचे‌ म्हणणे समजून घेतले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पर्यावरण विभागाचे उपअभियंता बन्सल यांनी उपोषणस्थळी येऊन नागरिकांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी लवकरात लवकर गणेश तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या उपोषणात गणेश तलाव मित्र मंडळाचे‌ सुर्यकांत मुथियान, राजेंद्र बाबर, विनोद पटेल, अशोक बाफना, छत्रपालसिंग तोमर, सिद्धराम शिरुरे, सुर्यकांत तळेकर, दत्तात्रय मापारी, मदन सोनिगरा, नागेंद्र गवळी सह प्रभागातील सर्व स्थानिक नगरसेवक आणि बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते