वाकड, दि. १० (पीसीबी) – ऑनलाइन माध्यमातून मिळालेले टास्क पूर्ण केल्यास आर्थिक मोबदला मिळेल असे आम्हीच दाखवून पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या बहाण्याने एका व्यक्तीची बारा लाख 85 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 27 मार्च ते 29 मार्च या कालावधीत वाकड परिसरात घडला.
संजय दशरथ अमृतकर (वय 51, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जेम्स, पूजन आणि प्रिशा नावाच्या व्यक्तींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी व्हाट्सअपद्वारे संपर्क केला. गुगल लोकेशन रिव्ह्यूज मध्ये दिवसातून एक ते दोन तास काम केल्यास प्रत्येक रीव्ह्यू मागे 150 रुपये देऊ असे फोनवरील अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना आमिष दाखवले. टास्कचे पैसे घेण्यासाठी टेलिग्राम अकाउंट जॉईन करण्यास सांगून त्यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी टप्प्याटप्प्याने बारा लाख 85 हजार रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीनंतर आरोपींनी फिर्यादी यांना कोणताही मोबदला अथवा त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.