सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या कुटुंबियाचे अजित पवार यांनी केले सांत्वन

0
319

शिरगाव, दि. ६ (पीसीबी) : १ एप्रिलला निर्घूण खून झालेले प्रति शिर्डी शिरगावचे (ता. मावळ, जि. पुणे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या कुटुंबियाची विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी सायंकाळी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. गोपाळेंच्या मारेकऱ्यांना फाशी होईल, असा तपास करण्यास पोलिसांना सांगितले असल्याचे अजितदादांनी यावेळी सांगितले.

अजितदादांबरोबर स्थानिक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) व पदाधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटेही होते. अजितदादांना पाहताच गोपाळे कुटुंबियांना भावना उफाळून आल्या. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी भावना त्यांनी अजितदादांकडे यावेळी व्यक्त केली.

ती मी व स्थानिक आमदार सुनील शेळके तडीस नेणार असल्याचे अजितदादांनी अर्धा तासाच्या या भेटीनंतर सांगितले. काही महिन्यांपूर्वीच गोपाळे यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली होती. १ तारखेला गावातील साईबाबा मंदिरासमोर त्यांचा तिघांनी कोयत्याने डोक्यात वार करून खून केला. या तिघा हल्लेखोरांसह या खूनप्रकरणी सातजणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिकट होत चालल्याचा हल्लाबोल अजितदादांनी गोपाळे कुटुंबाच्या भेटीनंतर राज्य सरकार व त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृहखात्यावर केला. कोयत्यानेच गोपाळेंचा खून झाला असून या कोयता गॅंगचा मुद्दा व प्रश्न नुकतेच सूप वाजलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनातही मांडला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

खून झालेल्या दिवशीच पोलिस अधिकाऱ्यांना या गुन्ह्याचा तपास राजकीय हस्तक्षेपाविना करण्यास सांगितले होते. आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या गोपाळेंच्या मारेकऱ्यांना फाशी होईल, असा तपास करण्यास सांगणार असल्याचे अजितदादा म्हणाले.