पुणे, दि. ६ (पीसीबी) – करोनाच्या काळापासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. मुंबई, ठाणे, औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत उलटून गेल्यामुळे त्या आता विसर्जित झाल्या आहेत. त्यामुळे या महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सध्या सुरु आहे. त्यामुळे राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न समोर आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकांविषयी महत्त्वपूर्ण भाकीत केलं आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुका या ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतात, असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरुन सध्या महानगरपालिका निवडणुकांचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. यासंबंधीचे कायदेशीर समस्या मे महिन्यापर्यंत निकालात निघू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रकरणाबाबत निर्णय दिला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील मार्ग मोकळा होईल. त्यानंतर पावसाळ्यात प्रभाग रचना आणि इतर प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबर महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे.