सेवा विकास बँक प्रकरणी सहा ठिकाणी ईडी ची छापेमारी

0
279

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) पथकाने मंगळवारी (ता. ४) पिंपरीत चार ठिकाणी छापेमारी केली. दि सेवा विकास बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी बँकेच्या तत्कालीन संचालकांसह संबंधित व्यक्तींच्या घरावर ही छापेमारी केली. दिवसभर कागदपत्रांची तपासणी सुरू होती. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

या बँकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चेअरमन, संचालक मंडळ, कर्मचारी यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, ईडीच्या पथकानेही चौकशी सुरू केली आहे. दोन महिन्यांपूर्वी बँकेचे तत्कालीन चेअरमन व माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांच्या घरावरही ईडीने छापा टाकला होता. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मूलचंदानी यांच्या कुटूंबियांवरही पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, मंगळवारी सकाळी ईडीच्या पथकाने या प्रकरणात आणखी एक कारवाई केली. या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या बँकेचे तत्कालीन संचालक तसेच इतरांच्या घरावर छापेमारी केली. त्यासाठी पिंपरी पोलिस ठाण्याकडून बंदोबस्तही देण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या कारवाईमुळे पिंपरी परिसरात खळबळ उडाली.